पती ऑनलाइन सर्च करत होता मसाजर, पण एस्कॉर्ट साइटवर दिसला पत्नी आणि बहिणीचा फोटो अन्...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2022 01:33 PM2022-12-13T13:33:56+5:302022-12-13T13:44:44+5:30
मुंबईत खार येथे राहणारा एक व्यक्ती ऑनलाइन साइटवर मसाजर शोधत होता. पण सर्च करता करता त्याला असं काही आढळलं की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली
मुंबई-
मुंबईत खार येथे राहणारा एक व्यक्ती ऑनलाइन साइटवर मसाजर शोधत होता. पण सर्च करता करता त्याला असं काही आढळलं की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्याच पत्नी आणि बहिणीचा फोटो एका एस्कॉर्ट साइटवर अपलोड झाल्याचं त्याला आढळून आलं. याप्रकरणी पोलिसांनी आता रेशमा यादव नावाच्या महिलेला अटक केली आहे.
पोलिसांना संशय आहे की रेशमा यादव त्याच गँगची सदस्य आहे जी सोशल मीडियात अनोळखी महिलांचे फोटो एस्कॉर्ट आणि मसाज साटइवर अपलोड करते. संबंधित व्यक्तीनं जेव्हा एस्कॉर्ट साइटवर आपल्या पत्नी आणि बहिणीचा फोटो पाहिला तेव्हा त्यानं तातडीनं याची माहिती दोघींनाही दिली. तेव्हा पत्नी आणि बहिणीनं संबंधित फोटो ३ ते ४ वर्ष जुने असून गैरवापर केला गेला असल्याचं निदर्शनास आणून दिलं.
ज्या व्यक्तीच्या पत्नी आणि बहिणीचे फोटो अपलोड केले गेले होते त्यानं संबंधित साइटवर एक फोन नंबर होता. त्यावर कॉल केला आणि समोरुन एका महिलेनं फोन उचलला जिचं नाव रेशम यादव असं होतं. तिनं भेटीसाठी खारमधील एका हॉटेलमध्ये त्याला बोलावलं. तो आपल्या पत्नी आणि बहिणीसह त्या हॉटेलवर पोहोचला जिथं रेशम यादवनं भेटीसाठी बोलावलं होतं. जेव्हा रेशम यादवला तक्रारदार व्यक्तीच्या पत्नी आणि बहिणीनं फोटोंबाबतचा जाब विचारला तर ती वाद घालू लागली. तसंच तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिला पकडून पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.
पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आणि रेशम यादव हिला अटक केली आहे. कोर्टानं तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसंच आपले फोटो सोशल मीडियावर अपलोड करताना सतर्क राहा आणि महत्वाची बाब म्हणजे आपलं प्रोफाइल लॉक करा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.