ड्रग्जच्या विळख्यात मुंबई! ‘न्याहरी’ कोडवर्ड वापरला की नशेबाजांना मिळते हवे ते...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 06:42 AM2022-12-14T06:42:11+5:302022-12-14T06:42:22+5:30
दोन दिवसांपूर्वी गांजा विक्रीचा व्हिडीओ व्हायरल होताच, माहीम पोलिसांनी संबंधित महिलेच्या सामानाची पुन्हा झाडाझडती घेतली. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सध्या शहरातील नशेबाजांमध्ये ‘न्याहरी’ हा कोडवर्ड वापरला जात आहे. हा कोडवर्ड कानात सांगितला की, रस्त्यावरच्या टपऱ्यांमध्ये विकला जाणारा गांजा सहज मिळतो. माटुंगा रोड स्थानकाजवळील उड्डाणपुलाखाली एक महिला खुलेआम ड्रग्ज विक्री करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
माटुंगा रोड स्थानकालगत असलेल्या सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या या महिलेकडून गेल्या अनेक वर्षांपासून गांजाची विक्री होत आहे. पोलिसांकडून वेळोवेळी कारवाईही करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी गांजा विक्रीचा व्हिडीओ व्हायरल होताच, माहीम पोलिसांनी संबंधित महिलेच्या सामानाची पुन्हा झाडाझडती घेतली. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. दुसरीकडे माटुंगा स्टेशन परिसरालगतही एक महिला गांजा विक्री करत होती. मात्र, पोलिसांच्या कारवाईमुळे गेल्या ४ महिन्यांपासून तिच्या ड्रग्ज विक्रीला ब्रेक लागला आहे.
फक्त ५ मिनिटे लागतात शोधायला...
गांजाचे सेवन करणाऱ्या तरुणाकडे ड्रग्ज विक्रेत्यांची माहिती घ्यायला किती वेळ लागतो, असे विचारताच कुठल्याही नवीन ठिकाणी अवघ्या ५ मिनिटांत ड्रग्जची माहिती मिळत असल्याचे त्याने सांगितले.
माटुंगा पश्चिम येथील सेनापती बापट मार्गावर काही ठिकाणी रेल्वेजवळील झोपड्यांवर यापूर्वीही पालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून कारवाई झाली आहे. मात्र, अतिक्रमण करणारे लोक पुन्हा झोपड्या उभारतात. आता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येथील सर्वच झोपड्यांवर कारवाई अपेक्षित आहे. - शीतल देसाई, माजी नगरसेविका
वेळोवेळी कारवाई
संबंधित महिलेबाबत तक्रार येताच दोन दिवसांपूर्वीच झाडाझडती घेण्यात आली. तसेच, यापूर्वीही वेळोवेळी कारवाई करण्यात आली आहे. तसेच, आमचे पथक लक्ष ठेवून आहे. संबंधित महिला ड्रग्ज विकताना आढळून आल्यास थेट गुन्हा नोंदवत कारवाई करण्यात येईल.
- प्रवीण कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, माहीम पोलिस ठाणे