मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी; आरोपी सापडला
By प्रविण मरगळे | Published: January 6, 2021 10:17 AM2021-01-06T10:17:52+5:302021-01-06T10:19:33+5:30
याबाबत पोलिसांनीही प्रचंड गुप्तता बाळगली, सध्या पोलिसांचा तपास सुरू असून आरोपीला शोधण्यात यश आलं आहे
मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकारणाला वेग आला आहे, अशातच मुंबईच्या महापौरकिशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ माजली आहे. मागील महिन्यात किशोरी पेडणेकर यांना अज्ञात नंबरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंद असून तपास सुरू आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांना मागील महिन्यात २१ डिसेंबर रोजी अज्ञात नंबरवरून कॉल आला होता, या कॉलवरून किशोरी पेडणेकर यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, मुंबईच्या आज्ञाद मैदान पोलीस ठाण्यात याबाबत किशोरी पेडणेकर यांच्याकडून तक्रार नोंदवण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, डिसेंबर २१ रोजी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना संध्याकाळी ६ च्या सुमारास अज्ञात नंबरवरून कॉल आला, समोरच्या व्यक्तीने कोणतंही नाव न घेता पेडणेकर यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, अज्ञात व्यक्ती हिंदी भाषेतून अर्वाच्च शब्दात किशोरी पेडणेकर यांच्यांशी बोलत होता. या कॉलनंतर २ दिवसांनी किशोरी पेडणेकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
याबाबत पोलिसांनीही प्रचंड गुप्तता बाळगली, सध्या पोलिसांचा तपास सुरू असून आरोपीला शोधण्यात यश आलं आहे, शेजारच्या राज्यात लपून असलेल्या आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झालं आहे अशी सूत्रांनी माहिती दिली, मात्र या घटनेला आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्व प्राप्त झालं आहे, २०२२ मध्ये मुंबईत महापालिका निवडणुका होणार आहेत. मागील निवडणूक शिवसेना आणि भाजपा यांनी दोघांनीही वेगळी लढली होती, त्यावेळी कमी फरकाने शिवसेनेने महापालिकेवरील सत्ता ताब्यात ठेवली.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं, एकेकाळी कट्टर विरोधक असणारे एकमेकांचे मित्र बनले, मुख्यमंत्रिपदावरून भाजपा-शिवसेना यांच्यात बिनसलं, त्यामुळे शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत राज्यात मुख्यमंत्रिपद मिळवलं, राज्यात सर्वाधिक जागा मिळवूनही विरोधी बाकांवर बसावं लागल्याने भाजपा संतप्त आहे, त्याचा बदला घेण्यासाठी भाजपा वर्षानुवर्ष शिवसेनेच्या ताब्यात असलेली मुंबई महापालिकेवर भाजपाचा महापौर बसवण्यासाठी प्रयत्नशील आहे.