सुपारी व्यापारी अडकित्त्यात; मुंबई, नागपूरमध्ये ईडीच्या १७ ठिकाणी धाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 07:43 AM2022-12-04T07:43:11+5:302022-12-04T07:43:27+5:30
२८९ टन सुपारी जप्त, व्यवहारांच्या केवायसी आणि अन्य व्यवहार तपशिलाची कागदपत्रेही व्यापाऱ्यांना सादर करता आली नाहीत.
मुंबई : दक्षिण आशिया प्रेफरन्शिअल ट्रेड कराराचे उल्लंघन करत म्यानमारमार्गे तस्करी करून भारतात आणलेल्या दुय्यम दर्जाच्या सुपारीसाठ्याचा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी पर्दाफाश केला. या प्रकरणी मुंबई आणि नागपूर येथे ईडीच्या अधिकाऱ्यांनी १७ ठिकाणी छापेमारी केली. त्यात साडेअकरा कोटी रुपये मूल्याची २८९ मेट्रिक टन सुपारी जप्त करण्यात आली. तसेच १६ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली. जप्तीची ही कारवाई नागपुरात झाली. या प्रकरणी तीनच दिवसांपूर्वी ईडीने नागपूरमधील काही सुपारी व्यापाऱ्यांवर छापेमारी केली होती.
या प्रकरणी ईडीकडून प्राप्त माहितीनुसार, दक्षिण आशिया प्रेफरन्शिअल ट्रेड करारांतर्गत दक्षिण आशियातील निश्चित देशांतून भारतात सुपारी येणे अपेक्षित होते. मात्र, ती तेथून न आणता इंडोनेशिया येथून भारतात आली. परंतु या सुपारीच्या आयातीचे इनव्हॉइस मात्र दक्षिण आशिया प्रेफरन्शिअल ट्रेड कराराअंतर्गत केल्याचे दाखवण्यात आले. भारतात सुपारीची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्यासंदर्भात मार्च, २०२१ मध्ये सीबीआयकडे तक्रार आली होती. मात्र, या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचे दिसून आल्यानंतर ईडीने हा तपास सुरू केला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या छापेमारीत म्यानमार येथून या सुपारीची तस्करी झाल्याचे दिसून आले. तसेच त्यासंदर्भातील इन्व्हॉयसेस आणि पावत्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले. व्यवहारांच्या केवायसी आणि अन्य व्यवहार तपशिलाची कागदपत्रेही व्यापाऱ्यांना सादर करता आली नाहीत. ही सुपारी तस्करी करून आणल्यामुळे या प्रकरणी करचोरी झाल्याचेही निदर्शनास आले आहे. तस्करी करून भारतात आलेल्या या सुपारीच्या साठ्याचे प्रामुख्याने वितरण हे महाराष्ट्रात नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यात झाले असल्याचे समजते.
दक्षिण आशिया प्रेफरन्शिअल ट्रेड करार काय आहे?
भारत, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाळ, मालदिव आणि श्रीलंका या देशांचा एक समूह असून काही विशिष्ट कृषी उत्पादनांचे व्यवहार या देशांनी आपापसात करणे अपेक्षित आहे. याकरिता दक्षिण आशिया प्रेफरन्शिअल ट्रेड करार करण्यात आला आहे. सुपारी या घटकाचादेखील याच कराराअंतर्गत व्यवहार होणे अपेक्षित आहे.
सुपारी तस्करीचे मोठे जाळे
सुपारी तस्करीचे हे मोठे जाळे असल्याचा ईडीला संशय आहे. व्यापारी, दलाल, मध्यस्थ, तस्कर, वाहतूक व्यापारी, हवाला ऑपरेटर अशी एक मोठी साखळी असून यामध्ये काही सरकारी अधिकारीदेखील गुंतले असल्याचा ईडीला संशय असून त्याअनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.