स्वातंत्रदिनी सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 08:27 PM2019-08-14T20:27:21+5:302019-08-14T20:29:21+5:30
मुंबईत ४० हजार पोलिसांचा फौजफाटा उद्या सुरक्षेसाठी सज्ज झाला आहे.
मुंबई - जम्मू काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढल्याने ७२ वर्षानंतर प्रथमच संपूर्ण देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा होणार असून या स्वातंत्र्य दिनावर दहशतवादी हल्याचे सावट आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईसह राज्यात आणि देशात हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. रेल्वे स्थानक, मंदीरे, शाळा-महाविद्यालयात चौवीस तास बंदोबस्त तैनात करण्या बरोबरच नाकांबदी देखील ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रणव अशोक यांनी दिली. मुंबईत ४० हजार पोलिसांचा फौजफाटा उद्या सुरक्षेसाठी सज्ज झाला आहे.
त्याचप्रमाणे राज्य एटीएस, फोर्स वन, श्वान पथक, शीघ्रकृती दल, वाहतूक विभाग, राज्य राखीव दल, सशस्त्र दल, होमगार्ड्स आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातच केंद्र सरकारने जम्मू काश्मीर राज्याचे कलम ३७० मधील काही अनुच्छेद तसेच ३५ अ कलम रद्द केल्याने, एकीकडे देशात उत्साहाचे वातावरण आहे. तसेच काही समाजकंटक आणि दहशतवादी संघटना या निर्णयाने दुखाविल्याने त्यानी घातपाताचा कट आखल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. यामुळे संपूर्ण देशांसह प्रत्येक राज्यातील राज्य पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी शहरातील अनेक ठिकाणी बंदोबस्तात वाढ केली आहे. गर्दीची रेल्वे स्थानके, गेट वे ऑफ इंडीया, जुहू चौपाटी, मारिन लाईन्स, मंत्रालय, सिद्धीविनायक मंदीर, स्वामी नारायण मंदिर, गिरगाव चौपाटी, सीएसएमटी रेल्वे स्थानक, चर्चगेट स्थानक, दादर स्थानकांवर मुंबई पोलिसांसह रेल्वे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. अनेक राजकीय पक्षांची कार्यालये त्याचप्रमाणे, शहरातील संवेदनशील भागात देखील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे, शाळा-महाविद्यालयाची देखील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. कारण शाळकरी विद्यार्थ्यांना टार्गेट करण्याचा कट या दहशतवादी संघटनांनी आखल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. तसेच मुबंईत येणाऱ्या वाहनांची देखील कसून तपासणी सुरु आहे. ठिकठिकाणी वाहतुक पोलिसांनी नाकाबंदी लावली आहे. गेस्ट हाऊस, हॉटेल, लॉजमध्ये देखील येणाऱ्या - जाणाऱ्यांची माहिती घेण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. त्याचप्रमाणे साध्या वेशात पोलिसांनी गस्त घालण्यास सुरुवात केली असून दुसरीकडे राज्य एटीएसने काही संशयीतांवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक पोलिसांनी परिसरातील गस्त वाढविली असून संशयित व्यक्ती आढळल्यास त्यांची चौकशी करण्यास सुरुवात आहे. त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त प्रणव अशोक यांनी नागरिकांना सतर्क राहून काही संशयित वस्तू अथवा गैरप्रकार आढळून आल्यास त्याबाबत पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे.
नौदल आणि तटरक्षक दलाला सतर्कतेचे आदेश
दरम्यान, मुंबई शहरावर दोन वेळा सागरी मार्गाने हल्ला झाला असून यावेळी देखील दहशतवादी संघटना हा मार्ग अवलंबवु शकतात. यामुळे नौदल आणि तटरक्षक दलाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. तर नौदलाने गस्ती नौकासह भरसमुद्रात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. यावेळी नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर देखील दिमतीला असल्याचे नौदल अधिकाऱ्याने सांगितले.