४० चोऱ्या करणाऱ्या चुहाला मुंबई पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 09:58 PM2019-07-15T21:58:46+5:302019-07-15T21:59:37+5:30
मोहम्मद जाफर करीम शेख या आरोपीला 'चुहा' म्हणून ओळखले जाते.
मुंबई - १९९४ पासून आतापर्यंत जवळपास ४० दुकानफोडी करून चोऱ्या करणाऱ्या 'चुहा' नावाच्या आरोपीला मुंबईपोलिसांच्या मालमत्ता कक्षाने अटक केली आहे. केवळ ४१ किलो वजन आणि ५ फूट ४ इंच उंचीमुळे मुंबई पोलिसांच्या यादीत मोहम्मद जाफर करीम शेख या आरोपीला 'चुहा' म्हणून ओळखले जाते.
मुंबईतील फुटपाथवर राहणारा 'चुहा' आरोपी दक्षिण मुंबईत सर्वात जास्त घरफोडी करत होता. एखादे दुकान फोडायचे असल्यास त्या दुकानासमोर तब्बल ३-४ दिवसरात्रीच्या वेळेस हा आरोपी झोपायचा. दरम्यान, दुकानाला कुठले कुलुप लावले आहे. ते कसे तोडता येईल, त्याला किती वेळ लागेल. या सगळ्या गोष्टींची रेकी केल्यानंतर चुहा आरोपी दुकानाचे शटर केवळ ३ मिनिटात तोडून उंदरासारखा दुकानात शिरायचा आणि दुकानातील मिळेल ते सामान चोरी करायचा. चोरीचे सामान तो चोर बाजारात विकायचा. चोरीच्या पैशातून मुंबईतल्या हॉटेलांमध्ये आणि बिअर बारमध्ये मौजमजा करायचा.दक्षिण मुंबईतील सोन्याच्या दुकानात झालेल्या चोरीच्या संदर्भात मुंबई पोलीस आरोपींचा शोध घेत होते. आजूबाजूच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा 'चुहा' वावरताना पोलिसांना दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.