जयसिंघानी तीन वेळा तीन मिनिटांआधी निसटला, संपर्क साधण्यासाठी घेत होता डोंगल, वायफायचा आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 11:04 AM2023-03-21T11:04:58+5:302023-03-21T11:06:13+5:30
Anil Jaisinghani : आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी जयसिंघानी याने मुंबई गुन्हे शाखेचे माजी पोलिस उपायुक्त अमर जाधव यांच्याविरोधात खंडणीचा आरोप केला.
मुंबई : तब्बल सात वर्षांनंतर वादग्रस्त क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानीला गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली. ७२ तासांच्या थरारक पाठलागादरम्यान तीन वेळा तो अवघ्या तीन मिनिटांआधी पथकाच्या हातातून निसटला होता. मात्र, अखेर तो जाळ्यात अडकला. जयसिंघानी संपर्कासाठी डोंगल, वायफायचा आधार घेत होता. त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे आव्हान यंत्रणांसमोर होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी जयसिंघानी याने मुंबई गुन्हे शाखेचे माजी पोलिस उपायुक्त अमर जाधव यांच्याविरोधात खंडणीचा आरोप केला.
या आरोपांमुळे जाधव यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्याची वेळ आली होती. पुढे या प्रकरणात आरोप खोटे असून जयसिंघानीवरच ठपका ठेवण्यात आला होता. जयसिंघानी हा सट्टेबाजीच्या अनेक प्रकरणांमध्ये गुंतला होता. तो एकप्रकारे टोळी चालवत असल्याचीही माहिती समोर येत आहे. तो त्याच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्धची माहितीही पोलिसांना देत त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडत असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळते आहे. २०१५ मध्ये जयसिंघानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या उल्हासनगर येथील घरात छापा कारवाई केली होती.
यावेळी मोठे नेटवर्क ईडीच्या हाती लागले. या प्रकरणात तब्येतीचे कारण पुढे त्याने उच्च न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. साकीनाका आणि आझाद मैदान पोलिस ठाण्यात २०१६ मध्ये त्याच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीत, अहमदाबाद कोर्टानेही त्याच्याविरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट जारी केले होते. यावेळीही त्याने आजारी पाडण्याचे नाटक केले होते. त्यानंतर, बायकोच्या शस्त्रक्रियेसंबंधित बनावट कागदपत्रेही सादर केले होते. ईडी अधिकाऱ्यांसह मुंबई, ठाणे, गोवा, आसाम, गुजरात आणि मध्य प्रदेश पोलिस त्याच्या मागावर होते.
यावेळीही त्याच्या मागावर गुजरातमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी, पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या ३ मिनिटे आधी निसटत होता. पोलिस आपल्या पाठीमागे असल्याची त्याला जाणीव होती, त्यामुळे तो सतत जागा बदलत होता. त्याच्यासोबत वेगवेगळ्या कंपन्यांचे डिव्हाइसेस आणि इंटरनेट वापरण्यासाठी असणारी विविध यंत्रणाही जप्त करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर सेलने रविवारी रात्री पावणेबारा वाजता त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
बक्षिसाचे बॅनर...
२०१८ मध्ये आझाद मैदान पोलिसांत दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाच्या आदेशाने त्याची माहिती देणाऱ्यांना बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार, आझाद मैदान परिसरात त्याची माहिती देणाऱ्याला योग्य बक्षीस देण्याबाबतचे बॅनरही पोलिसांकडून लावण्यात आले होते.
सतत जागा बदलत होता...
पोलिस आपल्या पाठीमागे असल्याची जयसिंघानी याला जाणीव होती, त्यामुळे तो सतत जागा बदलत होता. त्याच्यासोबत वेगवेगळ्या कंपन्यांचे डिव्हाइसेस आणि इंटरनेट वापरण्यासाठी असणारी विविध यंत्रणाही जप्त करण्यात आल्या आहेत.