मुंबईच्या फौजदाराची वीजचोरी पकडली; सहायक अभियंत्याला केली मारहाण, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 02:51 PM2022-05-08T14:51:40+5:302022-05-08T14:52:03+5:30
Crime News : अभियंता भोसले ‘वीजचोरी पकडणे माझे काम आहे’ असे वारंवार सांगत होते; परंतु निकाळजे यांनी काहीएक ऐकले नाही.
फलटण - हॉटेलची वीजचोरी रोखण्यास गेलेल्या महावितरण विभागाच्या सहायक अभियंत्याला हॉटेल मालक तथा वरळी येथे सहायक फौजदार पदावर कार्यरत असलेल्या दीपक सोपान निकाळजे यांनी शिवीगाळ, मारहाण व दमदाटी केली. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात निकाळजे यांच्याविरोधात वीजचोरी व शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महावितरण गिरवी (ता. फलटण) शाखेचे सहायक अभियंता भरत भोसले हे मंगळवारी (दि.३) दुपारी गिरवी येथील एका हॉटेलची वीजचोरी पकडण्यासाठी सहकाऱ्यांसमवेत गेले होते. या हॉटेलसाठी विजेच्या तारेवर आकडा टाकून वीजचोरी सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अभियंता भोसले यांनी आकडा काढला व पुढील कारवाईसाठी ते शाखा कार्यालयाकडे निघाले. यावेळी हॉटेल मालक दीपक सोपान निकाळजे तेथे आले. भोसले यांची गाडी अडवून त्यांना गाडीबाहेर खेचून आकडा का पकडला म्हणून शिवीगाळ सुरू केली.
‘तू गिरवीत पाय ठेवून दाखव, तुझे हात-पाय तोडेन. तुला जिवंत ठेवणार नाही’ असे म्हणत धक्काबुकी व दमदाटी केली. अभियंता भोसले ‘वीजचोरी पकडणे माझे काम आहे’ असे वारंवार सांगत होते; परंतु निकाळजे यांनी काहीएक ऐकले नाही. या घटनेनंतर भरत भोसले यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत निकाळजे यांनी १,२९७ युनिट वीजचोरी केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे निकाळजे यांच्यावर भारतीय विद्युत कायदा, शासकीय कामात अडथळा व धमकावल्या- प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच वीजचोरीपोटी १९ हजार ९४ रुपयांचा दंडही ठोठाविला आहे. कायद्याच्या रक्षकाकडूनच वीजचोरीचा प्रकार उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
वीजचोरी करणाऱ्यावर महावितरण वेळोवेळी कठोर कारवाई करते. दंड लावते. वीज चोर कोणी का असेना, त्याची कोणतीही गय केली जाणार नाही.
- गौतम गायकवाड, अधीक्षक अभियंता, महावितरण, सातारा