मुंबईतील पोलीस कॉन्स्टेबल अडकला KYC फ्रॉडच्या जाळ्यात; जुहू पोलिसांत घेतली धाव
By गौरी टेंबकर | Published: May 24, 2024 06:29 PM2024-05-24T18:29:54+5:302024-05-24T18:30:34+5:30
कॉन्स्टेबल एमसी चेतन (३८) असे सदर तक्रारदार पोलिसाचे नाव आहे.
गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वर्सोवा पोलीस ठाण्यातील एक कॉन्स्टेबल सायबर घोटाळ्याला बळी पडला. ज्यात त्यांना ३६ हजार ८४० रुपये गमवावे लागले. त्यांना केवायसी फ्रॉड मार्फत टार्गेट करण्यात आले याप्रकरणी त्यांनी जुहू पोलिसात तक्रार दिली आहे.
कॉन्स्टेबल एमसी चेतन (३८) असे सदर तक्रारदार पोलिसाचे नाव आहे. त्यांनी के वाय सी अपडेट न केल्यास त्यांचे नेट बँकिंग बंद होईल अशा आशयाचा मेसेज अनोळखी मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झाला. त्यातील लिंक त्यांनी क्लिक केल्यावर ती उघडली. तक्रारीत चेतनने यांनी म्हटले आहे की “माझे नेटबँकिंग ब्लॉक होण्याची मला भीती वाटू लागली. मी ताबडतोब मला मिळालेल्या लिंकवर क्लिक केले आणि बँकेशी साम्य असलेल्या वेबसाइटवर माझे पॅन कार्ड तपशील आणि वन-टाइम पासवर्ड टाकला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून ३६ हजार ८४० रुपये काढून घेण्यात आले. अज्ञात इसमाने बँक खात्याची केवायसी करण्याच्या बहाण्याने आपली फसवणूक झाल्याचे चेतन यांच्या लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी बुधवारी जुहू पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करवला.