दिराने वहिनीचा काटा काढण्यासाठी दिली ६० लाखांची सुपारी, हायप्रोफाईल दुहेरी हत्येच्या डाव मुंबई पोलिसांनी उधळला
By पूनम अपराज | Published: December 22, 2020 08:18 PM2020-12-22T20:18:26+5:302020-12-22T20:19:05+5:30
Crime News : दुहेरी हत्याकांड घडण्याआधीच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ९ ने कट उधळून लावला.
मुंबईपोलिसांच्या गुन्हे शाखेने एका हायप्रोफाइल हत्येच्या सुपारीच्या गुन्ह्याची उकल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी ५ आरोपींना अटक केली आहे. सुमारे ६० लाख रुपये सुपारी देवून वहिनी आणि तिच्या बहिणीच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाले आहे. मात्र, दुहेरी हत्याकांड घडण्याआधीच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ९ ने कट उधळून लावला.
मुंबईतील कुप्रसिद्ध मटका किंग सुरेश भगत याची पत्नी जया भगत आणि तिची बहिणीच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती. ही सुपारी सुरेश भगत याचा भाऊ विनोद भगत यानं दिल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. विनोद भगतनं लंडन येथील एका व्यक्तीला सुमारे ६० लाख रुपयांची सुपारी देऊन दोघींची हत्या करण्यास सांगितले असल्याची माहिती पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मटका किंग सुरेश भगत याची पत्नी जया भगत आणि तिची बहीण जामिनावर तुरुंगाबाहेर होत्या. या दोघींवर सुरेश भगत याची हत्या केल्याचा आरोप आहे. सुरेश भगतचा भाऊ विनोद याला आपल्या भावाच्या हत्येचा बदला घ्यायचा होता. त्यातूनच त्यानं वहिनी जया भगत आणि तिच्या बहिणीच्या हत्येची सुपारी दिली होती. विनोद भगतनं लंडन येथील मामूला दोघांच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यानुसार मामूने उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे ती सुपारी फिरवली होती.
बिजनौरच्या आरोपींनी अहमदाबाद आणि मुंबई येथील आरोपींच्या मदतीने जया भगत आणि तिच्या बहिणीची रेकी केली होती. त्यानुसार ते १८ डिसेंबरला खारदांडा रोडवरील शुभांगन हॉटेलसमोर उत्तर प्रदेशातील ते इसम दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. मात्र हत्या करण्याआधीच मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने २ आरोपींना अटक केली. आरोपींकडून २ गावठी कट्टे आणि ६ जिवंत काडतुसे जप्त, १३ मोबाईल्स, आधारकार्ड, स्टेट बँकेचे २ एटीएम कार्ट, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड, महिलांचे दोन रंगीत फोटो आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. नंतर पोलिसांनी बिजनौर येथून एक तर गुजरातमधील पालनपूर येथून एक अशा पाच आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी लंडन येथील असून तो फरार आहे. याप्रकरणी आणखी काही धागेदोरे हाती लागतात का, याचाही शोध पोलिस घेत आहेत.