दिव्यातील 'त्या' अपहृत मुलीची मुंबई पोलिसांनी केली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 07:00 PM2018-09-26T19:00:24+5:302018-09-26T19:00:43+5:30
शाकिर रहीम शेख (वय 24) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो सायन-कोळीवाडा येथे राहतो. विवाहित असलेला शाकिर वेल्डिंगचे काम करतो. शाकिर राहत असलेल्या परिसरात पीडित मुलींचे नातेवाईक राहतात. त्यामुळे दिव्यात राहणाऱ्या मुलींचे सायन कोळीवाडय़ात येणं-जाणं होतं. एक मुलगी 16 तर दुसरी 17 वर्षांची आहे.
मुंबई - दिवा येथे राहणाऱ्या मात्र कधी-कधी सायन-कोळीवाडा येथे नातेवाईकांकडे येणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना शिरढोण येथे एका भाडय़ाच्या खोलीत लपवून ठेवणाऱ्या 24 वर्षीय वेल्डरचा मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष - ४ ने माग काढला आहे. या भामटय़ाला अटक करून मुलींची सुटका केली आहे.
शाकिर रहीम शेख (वय 24) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो सायन-कोळीवाडा येथे राहतो. विवाहित असलेला शाकिर वेल्डिंगचे काम करतो. शाकिर राहत असलेल्या परिसरात पीडित मुलींचे नातेवाईक राहतात. त्यामुळे दिव्यात राहणाऱ्या मुलींचे सायन कोळीवाडय़ात येणं-जाणं होतं. एक मुलगी 16 तर दुसरी 17 वर्षांची आहे. 20 सप्टेंबर रोजी या दोघी गणपती पाहण्यासाठी सायन-कोळीवाडय़ात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर अचानक त्या दोघी गायबच झाल्या. त्यांच्या पालकांनी वडाळा टी.टी. पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंद केली. त्यानंतर कक्ष - ४ चे प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांच्या मार्गदर्शनाखाली मिंटे, बोटे यांच्यासह पथकाने तपास सुरू केला. दोघींपैकी एकीकडे मोबाइल होता. त्यामुळे वाशीमध्ये तिचे शेवटचे मोबाइलचे लोकेशन मिळाले. त्यानंतर वेगवेगळय़ा बाजूने सखोल चौकशी सुरू असताना शाकिरचे नाव पुढे आले. त्यामुळे शाकिरचा शोध सुरू केल्यावर तो पनवेलजवळील शिरढोण गावात असल्याची खबर मिळाली. त्यामुळे पथकाने शिरढोण गाठून शाकिरला ताब्यात घेतल्यावर त्याने तेथे एक खोली भाडय़ाने घेऊन दोन्ही मुलींना त्या ठिकाणी ठेवल्याचे निष्पन्न झाले. मग पोलिसांनी मुलींची सुटका करून शाकिरला बेडय़ा ठोकल्या. शाकिरने वेगवेगळी आमिषे दाखवून त्या मुलींचे स्वतःच्या फायद्यासाठी अपहरण केले होते. आरोपी शाकिरने त्यांना नेमकं कोणत्या कारणासाठी अपहरण केले होते याचा वडाळा टी.टी. पोलीस अधिक तपास करीत आहेत.