मुंबई पोलिसांना मराठीचा नाद; बोलणे, काम सारे मातृभाषेतच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 07:18 AM2022-08-03T07:18:35+5:302022-08-03T07:18:51+5:30
मुंबई पोलीस आयुक्तालयातील कामात मराठी भाषेचा वापर होतो किंवा नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी ‘मराठी भाषा दक्षता’ अधिकाऱ्याची नियुक्तीही केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता मराठीत बोलण्याबरोबर सर्व कामकाज मराठीतच करणे बंधनकारक राहणार आहे. मंगळवारी संबंधित आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले. तसेच, मुंबई पोलीस आयुक्तालयातील कामात मराठी भाषेचा वापर होतो किंवा नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी ‘मराठी भाषा दक्षता’ अधिकाऱ्याची नियुक्तीही केली आहे. क्वचित आवश्यकतेनुसार असल्यास मराठी व इंग्रजी भाषेत निमंत्रणपत्रिका असावी, असा आदेश आहे.
सर्व कामकाज मातृभाषेतच
योजनेची माहिती देणे, चर्चा करताना तसेच दूरध्वनीवर बोलणे
पत्रकार परिषद तसेच वरिष्ठ स्तरावर होणाऱ्या बैठकांमधील भाषा
प्रादेशिक विभाग/ परिमंडळीय कार्यालय/ विभागीय कार्यालय/ पोलीस ठाणे व इतर कार्यालयांनी जनतेशी सर्व पत्रव्यवहार व इतर कार्यालयीन कामकाज
नमुने पत्रके, परवाने आदी तसेच, कार्यालयांतील सर्व नोंदवह्या, प्रमाण नमुने, प्रपत्रे, विभागीय नियमपुस्तिका, टीपण्या, आदेश व पत्रव्यवहार यावरील परिपत्रके, अहवाल, कार्यवृत्ते तसेच संकेतस्थळे
पोलीस गणवेशावरील पाटी, ठाण्याबाहेरील नामफलक
शासकीय उपक्रम/ समारंभाची निमंत्रणे
परवाने, दंड पावत्या
जिल्हास्तरीय व इतर दुय्यम न्यायालयात दाखल करण्यात येणारे दावे