भाजपा नेत्याची हत्या करणाऱ्या यूपीच्या कुख्यात मिरची गॅंगच्या म्होरक्याची मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 06:43 PM2020-09-05T18:43:15+5:302020-09-05T18:46:20+5:30
उद्योगपती आणि राजकीय नेत्याची हत्या करून मागील एका वर्षांपासून फरार होता हा आरोपी
मुंबई - उत्तर प्रदेशात उद्योगपती आणि राजकीय नेत्याची हत्या करून मागील एक वर्षापासून फरार असलेल्या उत्तर प्रदेश राज्यातील कुख्यात मिर्ची गँगच्या म्होरक्यास मुंबईमध्ये जेरबंद केले आहे. गुन्हे शाखा क्खस ११ ने ही कारवाई केली आहे. प्रवीण उर्फ आशु उर्फ आकाश राजेंद्र सिंग (३२) असं या आरोपीचं नाव आहे. हा आरोपी विलेपार्ले पश्चिम येथील इर्ला मार्केटजवळील आलुवाडी येथे राहत होता. मूळचा हा आरोपी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील आहे.
सप्टेंबर २०१९ मध्ये धौलाना पोलीस ठाणे (जिल्हा- हापुड, उत्तर प्रदेश) च्या हद्दीत कुख्यात मिर्ची गँगचा म्होरक्या व त्याचे साथीदारांनी दिवसाढवळया चारचाकी वाहनातुन येवुन गोळीबार करून भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेता राकेश शर्मा, वय ३५ वर्षे यांची गोळया झाडून हत्या केली होती. त्याबाबत धौलाना पोलीस ठाणे (जिल्हा- हापुड़, उत्तर प्रदेश ) येथे भा. दं. वि. कलम ३०२, १२०(ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसचे जानेवारी २०२० मध्ये फेज-३, नोएडा पोलीस ठाणे हद्दीत नोएडा स्थित प्रसिध्द उद्योगपती गौरव चांडेल, वय ४५ वर्षे यांची कुख्यात मिर्ची गॅगच्या म्होरक्याने व त्याचे साथीदारांनी डोक्यात गोळ्या घालून हत्या केली व त्याची किया सेल्डोज कंपनीची कार जबरीने चोरुन नेली होती. त्याबाबत फेज-३, नोएडा पोलीस ठाणे येथे भा. दं. वि. कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. मिर्ची गॅंग ही गुन्ह्यांकरीता जबरीने चोरलेल्या वाहनांचा वापर करत असे. मिर्ची गँगच्या सततच्या गुन्हेगारी कारवायांमुळे या प्रवीण नावाच्या म्होरक्यास व त्याचे साथीदारांना पकडण्यासाठी उत्तरप्रदेश पोलीसांनी २,५०,०००/- रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
या गुन्हयांमध्ये गोळीबार करणारा मिर्ची गँगचा म्होरक्या हा गुन्हा केल्यानंतर पंजाब, हरीयाणा, दिल्ली, महाराष्ट्र अशा वेगवेगळया राज्यात आपले अस्तित्व लपवून रहात होता. त्याकरीता उत्तर प्रदेश पोलीसांनी सदर राज्यांत जाऊन, वेगवेगळया धडक मोहीमा राबवून त्यास पकडण्याचे अनेकदा प्रयत्न केले होते, परंतु सदर मुख्य आरोपी हा त्यांना सतत गुंगारा देवून पळून जाण्यात यशस्वी होत असे. उत्तर प्रदेश गुन्हे शाखेचे पथक हे सदर आरोपीचा शोध घेण्याकामी मुंबई येथे आले होते. त्या अनुषंगाने वरिष्ठांनी सदर आरोपीचा शोध घेण्याबाबतच्या सूचना कक्ष ११ ला दिल्या होत्या.
तपासात गुन्हयातील मुख्य पाहिजे आरोपी हा नाव व वेश बदलून लपून मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मागील काही महिन्यापासुन राहत असल्याची विश्वसनीय माहिती कक्ष ११ चे सपोनि झिने यांना मिळाली. त्यानुसार सदर माहिती वरिष्ठांना देण्यात आली. वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार, कक्ष-११ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनिल माने यांच्या पर्यवेक्षणाखाली सपोनि झिने व पथकाने एकता नगर (कांदिवली पश्चिम), बेहराम बाग (जोगेश्वरी पश्चिम), इर्ला मार्केट/प्रेमनगर (विले पार्ले पश्चिम) परिसरात पाळत ठेवली होती.खास बातमीदारांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करून पथकाने अहोरात्र मेहनत करून मानवी कौशल्याचा वापर करुन सदर पाहिजे आरोपी इसमाच्या हालचालींचा वेध घेवून त्यास आज इर्ला मार्केट/प्रेमनगर (विले पार्ले, पश्चिम) परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने उपरोक्त दोन्ही गुन्हे केल्याची व सदर गुन्हयांत अटक होवू नये म्हणून मागील एक वर्षापासून तो नाव व वेशांतर करुन पंजाब, हरीयाणा, दिल्ली, महाराष्ट्र येथे राहत होता अशी माहीती दिली.
अटक मुख्य आरोपी हा उत्तरप्रदेश, दिल्ली परिसरातील कुख्यात गुन्हेगार असून, तो मिर्ची गॅंग नावाने कुप्रसिध्द टोळी चालवित होता. या टोळीने अनेक गंभीर गुन्हे केलेले आहेत व गुन्हेगारी कार्यामध्ये सक्रीय असल्याची माहीती मिळाली आहे. सदर टोळीच्या सततच्या गुन्हेगारी कारवायांमुळे समाजात वाढलेली भिती पाहून त्यास वेळीच पकडण्यासाठी उत्तरप्रदेश पोलीसांनी अडीच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले आहे. सदर मुख्य आरोपी विरुध्द उत्तरप्रदेश राज्यातील बुलन्दशहर, भोजपूर, कविनगर, मुंडा पांडे, पिल्खुवा, बाबुगढ, घौलाना, हापुडनगर, फेज-३ या विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, चोरी, अग्निशस्त्राचा वापर, गुन्हेगारी टोळी चालविणे वगैरे स्वरुपाचे १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीस अटक करुन गुन्हे शाखा हापुड, उत्तरप्रदेश यांच्या ताब्यात पुढील कायदेशीर कारवाईकरीता दिले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार
सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला
Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा
बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल
महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ, सीआयडीचा क्राईम इन महाराष्ट्र २०१८ अहवाल जाहिर
मोठी बातमी! अखेर रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक