मुंबई पोलीस दलातील पोलिसाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार; पीडिता राहिली गरोदर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 09:44 PM2021-10-14T21:44:02+5:302021-10-14T21:45:33+5:30
Rape Case : पन्हाळा तालुक्यातील घटना, पोक्सोन्वये गुन्हा
कोल्हापूर : दहावीत शिकणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील पश्चिमेकडील गावातील अल्पवयीन (१५ वर्षे ५ महिने) मुलीवर पोलीस सेवेत असलेल्या नात्यातीलच विवाहित तरुणाने सलग दोन वर्षे अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा तरुण मुंबईपोलिसांत आहे. राजेंद्र गणपती पाटील (वय २८, रा. करंजफेन, ता. पन्हाळा) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पन्हाळा पोलिसांत बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) हा गुन्हा दाखल झाला असून आरोपीस मात्र अटक झालेली नाही.
पीडित मुलीची मासिक पाळी न झाल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात तपासणीसाठी नेल्यावर ती गरोदर असल्याचे सोमवारी (दि.११) स्पष्ट झाले. त्यानंतर तिला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मुलगी अल्पवयीन असल्याने हे प्रकरण सीपीआरमध्ये नोंद होऊन पन्हाळा पोलिसांकडे चौकशीसाठी गेले. त्यांनी १२ ऑक्टोबरला गुन्हा दाखल तरी केला परंतू त्यांनी चौकशीमध्येच चार दिवस घालवले. वृत्तपत्रांना कुणकुण लागल्यावर गुरुवारी त्याची माहिती देण्यात आली. ही मुलगी दहावीत शिकणारी आहे. सध्या ती दोन महिन्यांची गरोदर आहे. तिच्याकडे अधिक चौकशी केल्यावर संबंधित पोलिसाचे नाव पुढे आले. पोलिसाचे नाव पुढे आल्यावर पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करण्यात दिरंगाई केल्याची चर्चा आहे. बुधवारी गावातील काही लोकांचा जबाब नोंदवून घेण्यात आला. संबंधित पोलीस गावी कधी आला होता, याची मुख्यत: त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. हा पोलीस जुलैमध्ये गावी आला असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यानंतर कारवाईस वेग आला.
धमकी...
फिर्यादीत असे म्हटले, ही मुलगी अल्पवयीन आहे हे माहिती असतानाही त्यांने त्या मुलीस प्रेमाचे आमिष दाखवून जून ते ऑगस्ट २०२१ मध्ये करंजफेन (ता. पन्हाळा) येथील उत्तम केरबा पाटील यांच्या घरात अत्याचार केला. आपल्यात झालेले कुणाला सांगायचे नाही, अशी धमकीही त्यांने दिली.
कलमे अशी...
पन्हाळा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर १३०/२०२१ भादंविस कलम ३७६, ५०६ व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४, ५, ६, ८ व १० प्रमाणे.