मुंबई मॅरेथॉनसाठी मुंबई पोलीस सज्ज; वाहतुकीत बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 09:42 PM2020-01-18T21:42:38+5:302020-01-18T21:44:48+5:30
या मॅरेथॉनसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे.
मुंबई - उद्या रविवारी १९ जानेवारी मुंबईमॅरेथॉन होत आहे. या मॅरेथॉनसाठीपोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे. सीएए आणि एनआरसी कायद्यांविरोधात ठिकठिकाणी विरोध केला जात असल्याने या मॅरेथॉनमध्ये कोणत्याही बाजूने या कायद्याबाबत पडसाद उमटू नये अशा सूचना पोलिसांनी आयोजकांना दिल्या असल्याची माहिती मिळत आहे.मॅरेथॉनच्या दिवशी मुंबईतील ७६ रस्ते बंद करण्यात आले आहेत. २८ रस्त्यांवर नो पार्किंग करण्यात आली आहे. १८ रस्ते पार्किंगसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. २० पर्यायी मार्ग प्रवाशांसाठी सुरु ठेवण्यात आले आहेत.
मुंबई मॅरेथॉनसाठी ट्रॅफिक पोलिसांचाही मोठा बंदोबस्त असणार आहे. वाहतूक विभागाचे ६०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असणार आहेत. तसेच ३०० ट्रॅफिक वॉर्डन आणि ३ हजार स्वयंसेवक असणार आहेत. मुंबई मॅरेथॉन ही मुंबईतील एक मोठी आणि महत्वाची स्पर्धा आहे. २१ किलोमीटर, ११ किलोमीटर, जेष्ठ नागरिक आणि ड्रीम अशा चार प्रकारात या स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेत जगभरातील धावपटू सहभागी होत असतात. देशातील देखील हजारो धावपटू सहभागी होत असतात. यामुळे या स्पर्धेसाठी मोठा बंदोबस्त ठेवला जातो.
या मॅरेथॉनसाठी पोलीस ठाण्याचे तीन हजार पोलीस असणार आहेत. यामध्ये क्यूआरटी (शीघ्र कृती दल), आरसीपी, एसआरपीएफ पोलिसांचा समावेश असणार आहे. मॅरेथॉनच्या संपूर्ण रस्त्याची तपासणी बीडीडीएसचे (बॉम्ब शोधक आणि नाशक पथक) अधिकारी करणार आहेत. तसेच दहशतवाद विरोधी पथकही रस्त्याची तपासणी करणार आहे.