मुंबई पोलिसांची कारवाई, ५० लाखाच्या नशेसाठीच्या एक्स्टसी गोळ्या जप्त तर दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 09:59 PM2020-10-01T21:59:43+5:302020-10-01T22:00:04+5:30
Crime News :गुन्हा अन्वेषण शाखेच्या मालमत्ता कक्षाने ही कारवाई केली.
मुंबई- मुंबईपोलिसांची अंमली पदार्थ विरोधातील मोहीम सुरूच असून उच्चभ्रू वर्ग व महाविद्यालय तरुणामध्ये विक्रीसाठी आणलेल्या नशेसाठी वापरल्या २५० 'एक्स्टसी/ मडमा 'गोळ्या दोघा तरुणाकडून गुरुवारी जप्त केल्या. आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत त्याची किंमत ५० लाख असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गुन्हा अन्वेषण शाखेच्या मालमत्ता कक्षाने ही कारवाई केली.
आमिर फिरोज रफाई (वय - २५ ), इनायतअली उर्फ मोहम्मद ( ३२) अशी त्यांची नावे आहेत. दोघा कडे प्रत्येकी २५ लाखाच्या गोळ्या मिळाल्या. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. उत्तेजक गोळ्या विक्रीचे हे मोठे रॅकेट असून उत्तर प्रदेश,दिल्लीतून त्याचा पुरवठा करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्याठिकाणी लवकरच पथक जाणार असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. हस्तगत करण्यात आलेल्या “एक्सटॅसी गोळ्या विक्री करण्यासाठी दोघे तरुण जे. जे. हॉस्पिटल ,महंमद अली मार्गवर येणार असल्याची माहिती मालमत्ता कक्षाचे निरीक्षक अमित भोसले यांना मिळाली. त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत सापळा रचून दोघांना पकडले. झडतीमध्ये त्याच्याकडे प्रत्येकी २५० गोळ्या जप्त केल्या.