सायबर भामट्यांचे जाळे तोडणार मुंबई पोलीस; इन्स्टंट लोन ॲप, ओएलएक्स, केवायसी अन् सेक्सटॉर्शन ट्रेंडिंग गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 07:07 AM2022-05-31T07:07:20+5:302022-05-31T07:07:33+5:30

लॉकडाऊनमध्ये तर सायबर भामट्यांचा अक्षरश: सुळसुळाट झाला; परंतु आता सायबर भामट्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

Mumbai police to crack down on cyber criminals; Instant Loan App, OLX, KYC and Sextortion Trending Crime | सायबर भामट्यांचे जाळे तोडणार मुंबई पोलीस; इन्स्टंट लोन ॲप, ओएलएक्स, केवायसी अन् सेक्सटॉर्शन ट्रेंडिंग गुन्हे

सायबर भामट्यांचे जाळे तोडणार मुंबई पोलीस; इन्स्टंट लोन ॲप, ओएलएक्स, केवायसी अन् सेक्सटॉर्शन ट्रेंडिंग गुन्हे

Next

- गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई : ऑनलाइन पेमेंट, कार्डलेस पेमेंट अशा सुविधा मिळाल्यामुळे आर्थिक व्यवहार आणखी सुलभ झाले. एका क्लिकवर सर्व व्यवहार चुटकीसरशी होत आहेत; परंतु नेमकी हीच ऑनलाइन सुविधा आता नागरिक आणि पोलिसांसाठी प्रचंड डोकेदुखी ठरत आहे. तुमच्या डेबिट कार्डची मुदत संपली आहे, केवायसी अपडेट करावे लागेल, असे असंख्य कॉल्स येत असून, त्या माध्यमातून एका क्लिकवर लाखो रुपये वळते होत आहेत.

लॉकडाऊनमध्ये तर सायबर भामट्यांचा अक्षरश: सुळसुळाट झाला; परंतु आता सायबर भामट्यांची डोकेदुखी वाढणार आहे. कारण, वेगवेगळ्या आमिषाला बळी पाडणारे ट्रेंडिंग सायबर गुन्ह्यांची खडानखडा माहिती पोलिसांना मिळालेली आहे. त्यामुळे येत्या काळात सायबर भामट्यांचे जाळे पोलीस तोडतील, असे म्हटले तरी नवल वाटू नये. 

सायबर युनिटमध्ये कार्यरत तपास अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेतून सध्याच्या काळात ‘इन्स्टंट लोन ॲप’, ‘ओएलएक्स’ ‘केवायसी’ आणि ‘सेक्सटॉर्शन’ यामार्फत नागरिकांची फसवणूक करण्यात येत असून, याच माध्यमातून ८० टक्के ते ८५ टक्के सायबर फ्रॉड ऑपरेट केले जातात. ९० अर्ज अशाच फसवणुकीचे असून यामागे असलेल्या ‘मास्टरमाइंड’ची ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात नक्कीच यश येईल, असे मत अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

 ‘इन्स्टंट लोन ॲप’ आणि कार्यपद्धती? 
गरजेपोटी झटपट पैसे मिळविण्याच्या नादात पीडित हे ॲप इन्स्टॉल करतो. स्वतःची कागदपत्रे, फोटो आणि परिचित व्यक्तींची कॉन्टॅक्ट लिस्ट अनोळखी व्यक्तीकडे शेअर करण्यात येते. पैसे खात्यात टाकल्याच्या तीन-चार दिवसानंतर दुप्पट ते तिप्पट रकमेची मागणी करण्यासाठी धमकीचे मेसेज सुरू होतात. वेळेत पैसे न मिळाल्यास व्हॉट्सॲप क्रमांकावरून फोन करत संबंधित व्यक्तीचा फोटो अश्लीलपणे मोर्फ करत व्हायरल केला जातो जे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.
ऑपरेटिंग लोकेशन : गुडगाव, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक/बंगळुरू आणि तमिळनाडू

 ओएलएक्स फसवणूक कार्यपद्धती? 
आर्मी अधिकारी असल्याचा बनाव करत शिफ्टिंग करत असल्याचे सांगत गाडी नाहीतर फर्निचर अथवा अन्य वस्तू विक्रीसाठी टाकण्यात येते. तर कधी घर भाडेतत्त्वावर घेण्याची इच्छा व्यक्त करत लिंक अथवा क्यूआर कोड पाठवून तो स्कॅन करायला लावला जातो. त्यामुळे भामट्यांना आपल्या मोबाईल किंवा संगणकाचा एक्ससेस सहज उपलब्ध होतो. परिणामी आपल्या खात्यातून मोठी रक्कम काढण्यात येते. तर बऱ्याचदा वाहन किंवा फर्निचर विक्री अथवा खरेदीची इच्छा व्यक्त करत अशीच कार्यपद्धती वापरत फसवणूक केली जाते.
ऑपरेटिंग लोकेशन : राजस्थानमधील भरतपूर

केवायसी/क्रेडिट कार्ड फसवणूक कार्यपद्धती?
शॉपिंग मॉल, हॉटेल्स अथवा अन्य ठिकाणी आपले खासगी मोबाईल क्रमांक आपण शेअर करतो. या डेटाची लाखो रुपयांना विक्री केल्यावर त्याच मोबाईल क्रमांकावर बल्क मेसेज पाठवत बँक खाते किंवा सिमकार्ड, आधारकार्ड, क्रेडिट कार्डसाठी केवायसी अपडेट करा अन्यथा ते बंद होईल किंवा ब्लॉक करण्यात येईल अशी भीती दाखवणारे मेसेज येतात. घाबरून सदर व्यक्तीने त्यातील लिंक क्लिक केल्याने सर्व माहिती समोरच्या भामट्याला मिळते. त्यामार्फत तो आपले बँक खाते रिकामे करतो. अलर्ट मेसेज बंद करत शनिवार किंवा रविवारी पैसे काढण्यात येतात.
ऑपरेटिंग लोकेशन : झारखंड येथील जामतारा

सेक्सटॉर्शन कार्यपद्धती?
अनोळखी क्रमांक किंवा अकाऊंटवरून व्हॉट्सॲप किंवा फेसबुकवर मेसेज येतो. तो स्वीकार केल्यानंतर चॅटिंग सुरू करून अचानक व्हिडिओ कॉल येतो. तो उचलल्यानंतर समोर विवस्त्र अवस्थेत असलेली महिला अश्लील चाळे करत असते. समोर अनपेक्षित असे काही पाहिल्याच्या धक्क्यातून व्यक्ती सावरण्याआधीच त्याचा व्हिडिओ काढून घेत नंतर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली जाते.
ऑपरेटिंग लोकेशन : राजस्थानमधील भरतपूर

Web Title: Mumbai police to crack down on cyber criminals; Instant Loan App, OLX, KYC and Sextortion Trending Crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.