बालाकोट चॅट प्रकरणी अर्णब गोस्वामींवर FIR होणार, पण...; मुंबई पोलिसांचे हात बांधलेले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 10:39 AM2021-01-20T10:39:51+5:302021-01-20T10:41:03+5:30

Arnab Goswami's Balakot strike chat: महाराष्ट्र सरकारला या बाबतचे प्रश्न विचारले जात आहेत. गोपनियता भंग कायद्याद्वारे अर्णब आणि दासगुप्ता यांच्यावर एफआयआर दाखल कधी करणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Mumbai police will file FIR on Arnab Goswami on Balakot chat case, but ... | बालाकोट चॅट प्रकरणी अर्णब गोस्वामींवर FIR होणार, पण...; मुंबई पोलिसांचे हात बांधलेले

बालाकोट चॅट प्रकरणी अर्णब गोस्वामींवर FIR होणार, पण...; मुंबई पोलिसांचे हात बांधलेले

Next

मुंबई : ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल  (BARC)चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता याच्यासोबत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींचे जवळपास १००० पानांचे व्हॉट्सअॅप चॅट मुंबई क्राईम ब्रांचने आपल्या चार्जशीटमध्ये दाखल केले आहेत. यामध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या बालाकोट एअर स्ट्राईकवर चर्चा झालेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कारवाईची माहिती अर्नब यांना आधीपासून होती. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 


महाराष्ट्र सरकारला या बाबतचे प्रश्न विचारले जात आहेत. गोपनियता भंग कायद्याद्वारे अर्णब आणि दासगुप्ता यांच्यावर एफआयआर दाखल कधी करणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एनबीटीला महत्वाची माहिती दिली आहे. 


केंद्र सरकारने मनात आणले तर...
या अधिकाऱ्यानुसार, बालाकोटबाबतच्या चॅट या दोन व्यक्तींमध्ये आहेत. यामध्ये बालाकोटमध्ये भारत सरकार करणार असलेल्या संभाव्य कारवाईवर बोलले गेले आहे. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. कायद्यानुसार या प्रकरणी केंद्र सरकारने तक्रारदार बनायला हवे आणि मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल करायला हवा. मात्र, केंद्र सरकार असे करेल का, यावर केंद्रीय गृहमंत्रालय निर्णय घेईल, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली. 

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोपनीय असलेली माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी दिली. गोस्वामी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गृहमंत्री देशमुख यांच्याकडे केली. त्यानंतर त्यांनी उपरोक्त आश्वासन दिले.

सचिन सावंतांचे आरोप कोणते?
पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामी यांना घटनेच्या तीन दिवस आधीच होती, असे या संभाषणातून स्पष्ट होते. संरक्षणविषयक महत्त्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर असून लष्करी कारवाईसंदर्भातील माहिती बाहेर कशी आली, ती गोस्वामी यांना कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी म्हणजे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी कशी मिळाली, या सर्व प्रकारणाची चौकशी होणे गरजेचे आहे. गोस्वामी यांचे कृत्य गोपनीयतेचा कायदा भंग करणारे आहे. त्यावर कारवाईचे अधिकार राज्य सरकारला आहेत. त्यामुळे त्याला अटक करावी, त्यांच्या रिपब्लिक टीव्हीने अनेक बेकायदा कृत्य केली असून दूरदर्शनची सॅटेलाईट फ्रिक्वेन्शी बेकायदा वापरून प्रसार भारतीचे काेट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. 

Read in English

Web Title: Mumbai police will file FIR on Arnab Goswami on Balakot chat case, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.