मुंबई पोलिसांचे ‘ऑल आऊट’ ऑपरेशन; ६० जणांवर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 07:10 AM2023-12-03T07:10:42+5:302023-12-03T07:10:48+5:30
शुक्रवारी रात्री ११ पासून या ऑपरेशनची सुरुवात झाली. बृहन्मुंबईच्या हद्दीत एकूण २१४ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.
मुंबई : संपूर्ण मुंबईत पोलिसांनी राबविलेल्या ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान ३० जणांना अवैधरीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून या कारवाईदरम्यान पोलिसांच्या रेकॉर्डवरील ८ फरार आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून तलवार, चाकू इत्यादी शस्त्रे जप्त करण्यात आली.
शुक्रवारी रात्री ११ पासून या ऑपरेशनची सुरुवात झाली. बृहन्मुंबईच्या हद्दीत एकूण २१४ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. सर्व पोलिस ठाण्यांत मिळून एकूण १०८ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. या ऑपरेशनदरम्यान विविध गुन्ह्यांतील अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये, अमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली. तर, २२ ठिकाणी जुगाराच्या अड्ड्यांवर छापे टाकत ४३ आरोपींना अटक करण्यात आली. याखेरीज, मुंबईतून तडीपार करण्यात आलेले ४६ आरोपी मुंबई शहराच्या हद्दीत आढळून आले. त्यांना देखील अटक करण्यात आली आहे. नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी ७७३८ दुचाकींची तपासणी केली तर २४८३ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. ६० जणांविरोधात मद्यप्राशन करून वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.