मुंबई पोलीस झळकले सातासमुद्रापार; ऑस्ट्रेलियन नागरिकाचा लाखो रुपयांचा ऐवज दिला शोधून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 06:49 PM2019-11-19T18:49:22+5:302019-11-19T18:51:09+5:30
वनराई आणि कुलाबा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कामगिरीमुळे मुंबई पोलिसांचे नाव सातासमुद्रापार झळकले
मुंबई - वनराई आणि कुलाबा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कामगिरीमुळे मुंबईपोलिसांचे नाव परदेशात गाजले आहे. ऑस्ट्रेलियन नागरिकाचा गहाळ झालेला लाखो रुपयांचा ऐवज काही तासात या पोलीस पथकांनी शोधून दिला आहे. पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे मुंबई पोलिसांचे नाव पुन्हा एकदा सातासमुद्रापार झळकले आहे.
मूळचे ऑस्ट्रेलियाचे नागरिक असलेले अॅडम जॅक्सन हे आर्किटेक्ट असून अबूधाबी येथे राहतात. ते कामानिमित्त गेल्या आठवड्यात भारतात आले होते. गोरेगाव परिसरातील फ्रेन हॉटेल येथे थांबले होते. दरम्यान, अॅडम हे गेट वे ऑफ इंडिया येथे गेले. तेथून पुन्हा हॉटेलमध्ये येण्यासाठी टॅक्सीत बसले. हॉटेलच्या गेटसमोर अॅडम टॅक्सीतून उतरले. गडबडीत ते लॅपटॉपची बॅग टॅक्सीत विसरले. बॅगेची आठवण होईपर्यंत टॅक्सी चालक तेथून निघून गेला. अॅडम यांनी तात्काळ वनराई पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. रात्रपाळीला कर्तव्यावर असलेल्या पोलीस निरीक्षक खरात व पोलीस उपनिरीक्षक शिरवाडकर यांनी अॅडम यांना तात्काळ बॅग शोधून देण्याचे आश्वासन देऊन धीर दिला. कर्तव्यावर असलेल्या गुन्हे प्रकटीकरणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत घोणे यांनी पोलीस पथकासह फ्रेन हॉटेल येथे आले. हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अॅडम ज्या टॅक्सीतून उतरले त्याचा क्रमांक निदर्शनास आला. त्यानुसार एमएच - 01/ सीआर - 8101 या टॅक्सी क्रमांकावरून वनराई पोलिसांनी टॅक्सीमालक शिवशंकर कांबळे यांचा पत्ता शोधून काढला. ट्रक टर्मिनस येथील राहत्या घरी पोलिसांचे पथक पोहोचले. मात्र, कांबळे वनराई पोलिसांना भेटले नाही.
दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत घोणे यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले बॅचमेट सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत गावडे यांना घडलेली हकीकत सांगितली. कुलाबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे व वनराई पोलीस ठाण्याच्या पथकाने अखेर टॅक्सी चालकाचा शोध घेतला. टॅक्सीत विसरलेली अॅडम यांची काळ्या रंगाची लॅपटॉप बॅग ताब्यात घेतली. त्या बॅगेत 1500 अमेरिकन डॉलर्स (भारतीय चलन 10 लाख 65 हजार रुपये) निकॉन डी810 क्रमांकाचा डीएलएसआर कॅमेरा, निकॉन 70-200 कॅमेरा लेन्स, निकॉन 50 एमएमचे लेन्स, टॅमरॉन 24-70 एमएम कॅमेरा लेन्स, रोस वॉच असा लाखो रुपयांचा मुद्देमाल होता. गहाळ झालेला मुद्देमाल परत मिळाल्याने अॅडम जॅक्सन यांनी वनराई व कुलाबा पोलिसांचे आभार मानून मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.
In stormy situations, we must take calculated yet lightning fast decisions. On 16/11/19, API Ghone & team of Vanrai PS traced & nabbed a Taxi Driver in Colaba jurisdiction & recovered missing valuables worth US $15,000 belonging to Mr. Adam Jackson from Australia #BestDetectionpic.twitter.com/CEfOt7X4go
— Mumbai Police (@MumbaiPolice) November 19, 2019