कॉपीराईटशिवाय दाखवले अभिताभचे चित्रपट, मुंबई पोलिसांची या चॅनेलवर केली मोठी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 07:13 PM2021-01-25T19:13:45+5:302021-01-25T20:26:10+5:30
गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या टीआरपी घोटाळ्यादरम्यान कॉपीराईट शिवाय अभिताभ बच्चन यांचे चित्रपट दाखवल्या प्रकरणी आज मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
मुंबई - कॉपीराईटशिवाय अमिताभ बच्चन यांचे काही चित्रपट दाखवल्याप्रकरणी आज मुंबईपोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने महामुव्ही नावाच्या चॅनेलवर ही कारवाई केली असून, महामुव्ही चॅनेलचा सर्व्हर आणि कंटेंट सील केले आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी महामुव्हीजच्या सीईओंना अटक केली होती.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या टीआरपी घोटाळ्याप्रकरणी क्राइम ब्रँचने ३६०० पानांचे पुरवणी दोषारोपपत्र काही दिवसांपूर्वी दंडाधिकारी न्यायालयात दाखल केले होते. रिपब्लिक टीव्हीचे अधिकारी विकास खानचंदानी आणि बार्कचे माजी अधिकारी रोमिल रामगडीया, माजी कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्या विरोधात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. रिपब्लिक टीव्हीच्या अधिकारी प्रिया मुखर्जी, शिवेंदू मुळेलकर, रॉबर्ट वॉल्टर आणि शिव सुंदरम् हे फरार आरोपी असल्याचे दोषारोपपत्रात नमूद आहे.
काही वाहिन्या जाहिरातींद्वारे महसूल मिळविण्यासाठी टीआरपी वाढवून दाखवत असल्याची तक्रार बीएआरसी म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलिंग (बार्क)ने पोलीस ठाण्यात केली होती. या घोटाळ्यात रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा सहभागी असल्याचे नोव्हेंबर महिन्यात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.