मुंबईच्या व्यावसायिकाला ग्राहक मंचच्या आदेशाने अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 07:23 PM2019-05-17T19:23:19+5:302019-05-17T19:27:50+5:30
दरखास्त प्रकरण : आदेशाची पूर्तता न करणे भोवले
अमरावती - निवाड्यातील आदेशाची पूर्तता न करणाऱ्या मुंबईच्या एका व्यावसायिकाला जिल्हा ग्राहक मंचच्या आदेशाने पोलिसांनी बुधवारी अटक केली. तक्रारकर्त्याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दरखास्त प्रकरण दाखल केले होते. त्या अनुषंगाने समन्स व वॉरंट निघाला होता. बुधवारी व्यावसायिक ग्राहक मंचात हजर झाल्यानंतर त्याला अटक करण्याचे आदेश झाले. त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
सूत्रानुसार, हेमंत मेहता (रा. घाटकोपर पूर्व) असे सदर व्यावसायिकाचे नाव आहे. शहरातील ओम कॉलनीतील रहिवासी अभिजित किशोर सपकाळ व अन्य एक यांच्या शेतजमिनीवरील शेडनेट उभारण्याविषयी व्ही.आर. अॅग्रोटेकतर्फे हेमंत मेहता यांच्याशी आर्थिक व्यवहार झाले होते. या व्यवहाराच्या अनुषंगाने किशोर सपकाळसह दोघांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार नोंदविली. ग्राहक मंचाने दोन्ही बाजूंची पडताळणी केल्यानंतर २ डिसेंबर २०१५ रोजी निर्णय दिला.
हेमंत मेहता यांनी तक्रारकर्त्यास ३० दिवसांच्या आत ७ लाख ५९ हजार ३१० रुपये १० टक्के व्याजासह रक्कम परत करावी, नुकसान भरपाई म्हणून २ लाख रुपये द्यावे, तक्रार खर्च १० हजार रुपये द्यावा, असे आदेश ग्राहक मंचने पारित केले होते. मात्र, आदेश प्राप्त झाल्यानंतरही हेमंत मेहता यांनी पूर्तता केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने ग्राहक मंचकडे ६ जानेवारी २०१७ रोजी दरखास्त प्रकरण दाखल केले. ग्राहक मंचाकडून हेमंत मेहतांना समन्स पाठविण्यात आला. त्यानंतरही ते उपस्थित झाले नाहीत. त्यामुळे त्यांचा वॉरन्ट काढण्यात आला. बुधवारी हेमंत मेहता ग्राहक मंचात उपस्थित झाले. त्यावेळी ग्राहक मंचाने हेमंत मेहतांना अटक करण्याचे आदेशीत केले. फ्रेजरपुरा पोलिसांनी त्यांना अटक करून कारागृहात पाठविले. मेहता यांच्या वकिलांनी जामीनसाठी जिल्हा ग्राहक मंचात अर्ज केला. अध्यक्ष व सदस्य यांनी त्यांच्या जामीनचे आदेश गुरुवारी पारित केले.