मुंबईतील कुख्यात गुंडाला चिपळुणात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 01:09 AM2019-10-02T01:09:05+5:302019-10-02T01:09:22+5:30
गंभीर स्वरूपाचे २0हून अधिक गुन्हे दाखल असलेला आणि महिनाभर मुंबईतून फरार असलेला कुख्यात गुंड सिद्धेश बाळा म्हसकर (३६, अंबरनाथ, ठाणे) याला चिपळूण रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली आहे.
चिपळूण : गंभीर स्वरूपाचे २0हून अधिक गुन्हे दाखल असलेला आणि महिनाभर मुंबईतून फरार असलेला कुख्यात गुंड सिद्धेश बाळा म्हसकर (३६, अंबरनाथ, ठाणे) याला चिपळूण रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी ठाणे पोलीस, रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि चिपळूण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक (एमपीडीए) अंतर्गत ही संयुक्त कारवाई केली.
मुंबई पोलिसांच्या वाँटेड यादीत असलेल्या सिध्देश म्हसकर याच्यावर खुनाचा प्रयत्न तसेच गंभीर दुखापत करण्याचे २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे गेले महिनाभर त्याचा शोध सुरू होता. तो कोकण रेल्वेने प्रवास करत असल्याची माहिती ठाणे शहर कोपरी पोलिसांना मिळाली. तातडीने याबाबतचा संदेश रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे व चिपळूण पोलिसांकडे देण्यात आला.
पोलिसांनी तातडीने सुत्रे फिरवली. चिपळूण व रत्नागिरी पोलीस तातडीने चिपळूण रेल्वे स्थानकावर हजर झाले आणि सापळा रचून म्हसकर याला पकडण्यात आले. पाठोपाठ कोपरीचे पोलीस पथकही तेथे दाखल झाले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर येथील पोलिसांनी त्याला ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास चव्हाण, हेडकॉन्स्टेबल संजय कांबळे, संदीप कोळंबेकर, पोलीस नाईक नितीन डोमणे, कॉन्स्टेबल दत्ता कांबळे तसेच चिपळूण पोलीस स्थानकातील पोलीस नाईक गणेश पटेकर, कॉन्स्टेबल आशिष भालेकर, मारूती जाधव हे या कारवाईत सहभागी झाले होते.