मुंब्रा येथे शिजत होता घातपाताचा कट; नऊ संशयित आरोपींपैकी एक अल्पवयीन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 04:16 PM2019-01-23T16:16:59+5:302019-01-23T16:19:30+5:30
एटीएसच्या सुमारे १२ पथकांनी औरंगाबाद आणि ठाण्यातील मुंब्रा येथील आठ ठिकाणाहून ९ जणांना ताब्यात घेतले. या ९ जणांपैकी १ जण अल्पवयीन म्हणजेच १७ वर्षाच्या आहे.
मुंबई - काही तरुण मुंब्रा आणि औरंगाबाद येथे आयसिस या संघटनेशी जोडले गेलेले असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) सूत्रांना मिळाली होती. त्यानुसार एटीएसने काही आठवडे सतत प्रत्यक्ष व तांत्रिक पातळीवर नजर ठेवली होती. संशयित ताब्यात घेतलेल्या व्यक्ती या २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर काही अतिरेकी कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न होताच एटीएसच्या सुमारे १२ पथकांनी औरंगाबाद आणि ठाण्यातील मुंब्रा येथील आठ ठिकाणाहून ९ जणांना ताब्यात घेतले. या ९ जणांपैकी १ जण अल्पवयीन म्हणजेच १७ वर्षाच्या आहे.
एटीएसने सलमान खान, फहाद शाह, झमेन कुटेपडी, मोहसीन खान, मोहम्मद मझर शेख, ताकी खान, सरफराज अहमद, झाहीद शेख आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा या संशयित आरोपींना अटक केले असून त्यांच्याकडून काही रसायने, इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स, धारदार चाकू, मोबाईल्स आणि सिम कार्ड्स पोलिसांनी हस्तगत केले आहे. आयसिस या आंतराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या विचारसरणीने प्रेरित होऊन दहशतवादी टोळी बनविण्याचे व दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचे कट रचून त्या दृष्टीने साहित्याची जमवाजमव केल्याचे निष्पन्न होत असल्याने ताब्यात घेतलेल्या संशयितांविरोधात बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा १९६७ कलम १८, २०, ३८, ३९,भा . दं. वि. कलम १२० (ब), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.