लिपिकाचा प्रताप, महापालिकेत सव्वा तीन लाखाची अफरातफर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 01:55 PM2020-06-17T13:55:32+5:302020-06-17T13:57:49+5:30
शहर पोलिसात गुन्हा दाखल
सांगली - महापालिकेच्या प्रभाग समिती एककडील लिपिकाने ३ लाख २९ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दत्तात्रय विठ्ठल मद्रासी असे लिपिकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
महापालिकेच्या प्रभाग समिती एककडे दत्तात्रय मद्रासी हा गेल्या सहा-सात वर्षापासून लिपिक म्हणून काम पाहत होता. त्याच्याकडे माहिती अधिकार, अनामत व बयाणा रक्कम वसूल करुन लेखा विभागाकडे भरणे, ठेकेदारांना अनामत रक्कम परत करणे, निविदा प्रक्रिया राबविणे, सर्व प्रकारची बिले तयार करणे आदि काम सोपविण्यात आले होते. मद्रासी याने ठेकेदाराकडील वसूल केलेली अनामत रक्कम लेखा विभागाकडे भरलेली नाही. त्याने ३ लाख २९ हजार २५८ रुपयांची अफरातफर केल्याचे लेखा विभागाच्या अहवालातून उघडकीस आले. त्यानंतर सहाय्यक आयुक्त कावडे यांनी ही बाब आयुक्त नितिन कापडणीस यांच्या निदर्शनास आणून दिली. आयुक्तांनी कायदेशीर अभिप्राय घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कावडे यांनी मंगळवारी सायंकाळी मद्रासी याच्याविरुद्ध शहर पोलिसात अपहारप्रकरणी तक्रार दाखल केली. चौकट मार्चपासून गैरहजर दत्तात्रय मद्रासी हा गेली सहा सात वर्षे प्रभाग समितीकडे लिपिक म्हणून काम करत होता. यापूर्वी तो जकात विभागात होते. तो मार्च महिन्यापासून कामावर गैरहजर आहे. त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी होत्या असे सहाय्यक आयुक्त कावडे यांनी सांगितले.
बाप की नरपिशाच्च? लॉकडाऊनमध्ये पोटच्या मुलीवर बलात्कार करून द्यायचा गर्भपाताचे औषध