पालिका अधिकारी समजून ठगाला दिले पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 05:48 AM2018-11-07T05:48:57+5:302018-11-07T05:49:07+5:30
पालिका अधिकारी समजून सराफाने ठगालाच लाखो रुपये दिल्याचा प्रकार खारमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच, पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : पालिका अधिकारी समजून सराफाने ठगालाच लाखो रुपये दिल्याचा प्रकार खारमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच, पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
वांद्रे परिसरात नीलेश सोनी (३६) राहण्यास आहेत. त्यांना ज्वेलरीच्या दुकानाच्या बाहेर एलईडी बोर्ड लावण्याबाबत परवानगी हवी होती. त्यासाठी पालिका अधिकारी असल्याचे भासवून ठगांनी त्यांच्याशी ओळख वाढविली. सोनी यांचा विश्वास संपादन केला. परवानगी देण्याच्या नावाखाली ४५ हजार रुपयांची मागणी केली. सोनी यांनी त्यांना ४५ हजार रुपये दिले.
पुढे अनेक दिवस झाले, तरी पालिका विभागाकडून काहीच हालचाली नसल्याने त्यांनी संशय आला. त्यांनी पालिका कार्यालयात विचारणा केली. मात्र, असे कोणतेही अधिकारी तेथे कार्यरत नसल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. अखेर त्यांनी याबाबत खार पोलिसांत तक्रार दिली. तपासात पालिका अधिकारी असल्याचे भासवून आरोपींनी त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले. पोलीस अधिक तपास करीत आहेत.