माहीमच्या सेंट झेवियर्समध्ये ‘मुन्नाभाई’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 05:48 AM2020-07-27T05:48:55+5:302020-07-27T05:49:05+5:30

मनीष केवलचंद खोब्रागडे असे प्रतापी शिक्षकाचे नाव आहे. ८ मार्च २००६ पासून तो या इन्स्टिट्यूटमध्ये अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहे. ज्या वेळी त्याची नियुक्ती झाली त्या वेळचे प्राचार्य, प्रबंधक, कार्यालयीन अधीक्षक सेवानिवृत्त झालेले आहेत.

'Munnabhai' at St. Xavier's in Mahim | माहीमच्या सेंट झेवियर्समध्ये ‘मुन्नाभाई’

माहीमच्या सेंट झेवियर्समध्ये ‘मुन्नाभाई’

Next

मनीषा म्हात्रे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील कथेप्रमाणे माहीम येथील एका नामांकित इन्स्टिट्यूटमध्ये एका शिक्षकाने बनावट डिग्रीच्या आधारे नोकरी मिळवून तब्बल १३ वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिल्याचा प्रताप समोर आला आहे. माहीमच्या सेंट झेविअर्स टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये हा प्रकार घडला असून या प्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  


मनीष केवलचंद खोब्रागडे असे प्रतापी शिक्षकाचे नाव आहे. ८ मार्च २००६ पासून तो या इन्स्टिट्यूटमध्ये अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहे. ज्या वेळी त्याची नियुक्ती झाली त्या वेळचे प्राचार्य, प्रबंधक, कार्यालयीन अधीक्षक सेवानिवृत्त झालेले आहेत. मुलाखतीदरम्यान त्याने पदवी तसेच अभियांत्रिकी (बीई) पदवी घेतल्याचे नमूद केले होते. धक्कादायक बाब म्हणजे निवड झाली तेव्हाही त्याने शैक्षणिक कागदपत्रे सादर केली नव्हती. कालांतराने खोब्रागडेने बढतीसाठी अर्ज केला. या अर्जावरून इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. शिवाजी बापूराव घुंगराड यांनी त्याचा प्रगती अहवाल तपासण्यास सुरुवात केली. त्यात १३ वर्षांच्या  कार्यकाळात त्याची ३४० दिवस बिनपगारी रजा झाल्याने त्यांना संशय आला. त्यांनी त्याच्याकडे शिक्षणाबाबतची मूळ कागदपत्रे मागण्यास सुरुवात केली. त्या वेळीही कौटुंबिक कारण, आजारपणाचे कारण व असाधारण रजा मंजूर करून वेळ मारून नेली. कागदपत्रे जमा न केल्यास पोलिसांत तक्रार देण्यात येईल, अशी धमकी संस्थेकडून देण्यात येताच १९ नोव्हेंबर २०१८ रोजी त्याने बी.ई.च्या ११ गुणपत्रिका आणून दिल्या.
त्या सर्व गुणपत्रिका नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडे चौकशीसाठी पाठवताच त्या बनावट असल्याचे उघड झाले.

१७ डिसेंबर रोजी याबाबतचा अहवाल प्राप्त होताच संस्थेला धक्का बसला. त्याला जूनपर्यंत त्याची बाजू मांडण्याची आणि लेखी खुलासा करण्याची मुभा दिली होती. मात्र सहा महिन्यांपासून तो रजेवर आहे. अखेर, संस्थेने माहीम पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करत आहेत.  


बँकांनाही गंडा
खोब्रागडेने जशी संस्थेची बनावट कागदपत्रे देऊन फसवणूक केली तशीच त्याने बऱ्याच बँकांचीही फसवणूक केल्याचे आढळले आहे. जीवन विकास नागरी सहकारी पतपेढी (मर्यादित) वाघोली येथून पावणेदोन लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचेही समोर आले.

बढतीसाठी अर्ज
केल्यानंतर पितळ उघड

मनीष खोब्रागडे याने शैक्षणिक प्रमाणपत्र दाखल केल्यानंतर त्याची पडताळणी केली. त्यात ते बनावट असल्याचे समोर आले. यात मुलांचे नुकसान झाले आहे, शिवाय शासनाची फसवणूक केल्याने त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तसेच त्याला निलंबित करण्यात आले आहे.
- डॉ. शिवाजी बापूराव घुंगराड, प्राचार्य, सेंट झेविअर्स टेक्निकल इन्स्टिट्यूट माहीम 

तपास सुरू
बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसून, अधिक तपास सुरू आहे.
- मिलिंद गाडनकुश,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, माहीम 

Web Title: 'Munnabhai' at St. Xavier's in Mahim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.