हत्येच्या आरोपातील गुन्हेगाराची मेडिकलमधून धूम; पोलिसांची भागमभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 08:09 PM2021-12-05T20:09:25+5:302021-12-05T20:09:46+5:30
मेडिकलमधून पळून गेलेल्या शोएबला शोधण्यासाठी शहर पोलिसांची यंत्रणा धावपळ करीत होती. शोएब रेल्वेस्थानकाजवळ, कॉटन मार्केटच्या परिसरात सकाळपासून भटकंती करत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - कर्करोगाच्या उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केलेल्या एका हत्येच्या आरोपातील कैद्याने पोलिसांची नजर चुकवून रविवारी सकाळी धूम ठोकली. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांची प्रचंड तारांबळ उडाली. तब्बल ८ तास भागमभाग केल्यानंतर पळून गेलेल्या कैद्याला आरोपी सेलच्या पोलीस पथकाने शोधून काढले.
सोनू उर्फ सोहेल उर्फ शोएब खान बब्बू खान (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे. तो ताजबाग, सक्करदरामधील रहिवासी आहे. कोरोनाचा सर्वत्र कहर असताना गेल्या वर्षी आरोपी शोएबने धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाची हत्या केली होती. पोलिसांनी अटक करून चाैकशी केल्यानंतर त्याला मध्यवर्ती कारागृहात डांबले. ३१ जुलै २०२० पासून तो कारागृहात आहे.
दरम्यान, त्याला कर्करोग झाल्याने मेडिकलच्या वार्ड नंबर १९ मध्ये दाखल करण्यात आले होते. सकाळी ६.३० ते ७ च्या दरम्यान त्याने नैसर्गिक विधीसाठी गर्दी झाल्याची संधी साधून शोएबने मेडिकलमधून धूम ठोकली. ते लक्षात आल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना तसेच गुन्हे शाखेच्या विविध तपास पथकांना देण्यात आली. पोलीस मुख्यालयाचे उपायुक्त संदीप पखाले, एसीपी विलास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी सेलचे एपीआय राजकुमार वानखेडे, एएसआय रतन उंबरकर यांनीही आपल्या चमूंना शोएबला शोधण्यासाठी कामी लावले.
कॉटन मार्केटमध्ये भटकंती
मेडिकलमधून पळून गेलेल्या शोएबला शोधण्यासाठी शहर पोलिसांची यंत्रणा धावपळ करीत होती. तर, शोएब रेल्वेस्थानकाजवळ, कॉटन मार्केटच्या परिसरात सकाळपासून भटकंती करत होता. दुपारी ३ वाजता तो पोलिसांना आढळला. त्याला ताब्यात घेऊन एपीआय वानखेडे, एएसआय रतन उंबरकर, नुसार हवलदार मंगेश जुगादे, शाम मिश्रा, अंमलदार प्रफुल्ल बोरकर, अभय मारोडे, रोशन निंबर्ते, पंकज चिव्हाणे, अश्विन सोमकुंवर यांनी वरिष्ठांसमोर हजर केले. नंतर त्याच्याविरुद्ध हवलदार रामनरेश लक्ष्मण जयस्वाल यांनी अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली.