शायदा बानो हत्याकांडातील आरोपीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 08:21 PM2020-08-18T20:21:21+5:302020-08-18T20:21:48+5:30
आरोपी नासिर खान याची १ आॅगस्ट रोजी जामिनावर सुटका होताच १५ दिवसांतच त्यांची अकोट फैल परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली.
अकोला : डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ६ आॅक्टोबर २०१९ मध्ये घडलेल्या शायदा बानो या महिलेच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी नासिर खान याची १ आॅगस्ट रोजी जामिनावर सुटका होताच १५ दिवसांतच त्यांची अकोट फैल परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवार १८ आॅगस्ट रोजी पहाटे उघडकीस आली असून, या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गजानन वाटिका परिसरात ६ आॅक्टोबर २०१९ रोजी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी महिलेची ओळख पटविली असता ती मुंबई येथील रहिवासी असल्याचे समोर आले होते. या महिलेचे नाव शायदा बानो राजू यादव असे असल्याचेही पोलीस तपासात समोर आले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ व त्यांच्या पथकाने या प्रकरणातील आरोपी नासीर खान अजिज खान व त्याच्या सोबत असलेली महिला शमिना बानो या दोघांना अटक केली होती. तेव्हापासून दोन्ही आरोपी कारागृहात असताना त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १ आॅगस्ट रोजी जामीन मंजूर केला. त्यानंतर दोन्ही आरोपी बाहेर येताच १८ आॅगस्टच्या पहाटे अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयस्वाल धाब्यासमोर नासीर खान अजिज खान यांचा मृतदेह आढळला. त्यांची हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे असून, याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू केला आहे.