Crime Petrol बघून केला प्लान, स्वत:ला वाचवण्यासाठी दुसऱ्याची हत्या; वाचा कसा झाला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 11:53 AM2022-11-08T11:53:48+5:302022-11-08T11:56:18+5:30
Crime News : पोलिसांनी सांगितलं की, आरोपी फिरोज विरोधात 24 गुन्हे दाखल आहेत. ज्यात लूट, हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
Crime News : प्रयागराजमध्ये पोलिसांनी एनकाउंटरमध्ये एका गुन्हेगाराला अटक केली. तो टीव्ही मालिका Crime Petrol मधून आयडिया घेऊन त्याचे जुने गुन्हे मिटवण्याचा प्रयत्न करत होता. यासाठी त्याने एका अशा व्यक्तीची हत्या केली, जो त्याच्या उंची-रंगाचा होता. पोलीस बऱ्याच दिवसांपासून या आरोपीचा शोध घेत होते. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी फिरोज विरोधात 24 गुन्हे दाखल आहेत. ज्यात लूट, हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
करछना पोलिसांनी सोमवारी रात्री छापेमारी दरम्यान फिरोजला अटक केली. पोलिसांनी सांगितलं की, या गुन्हेगाराच्या कायदेशीर प्रक्रियेत खूप पैसेही खर्च झाले होते. ज्यामुळे त्याच्यावर खूप कर्ज होतं. त्यामुळे त्याने Crime Petrol पाहून आपलं कर्ज आणि सगळे गुन्हे मिटवण्याचा अनोखा प्लान केला होता. यासाठी त्याने सूरज गुप्ता नावाच्या एका व्यक्तीला निवडलं आणि त्याची हत्या केली.
17 ऑक्टोबर 2022 ला करछना भागात एका ढाब्याजवळ पोलिसांना एक शीर कापलेला एक मृतदेह आढळून आला होता. मृत व्यक्ती बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील पीपी रोड भागात राहणारा सूरज गुप्ता होता. सुरवातीला पोलिसांना काहीच समजलं नाही. कारण मृतदेहाजवळ पोलिसांना एक पाकिट सापडलं होतं. ज्यात फिरोज अहमदचं ड्राईव्हिंग लायसन्स होतं. पण जेव्हा केसची खोलात चौकशी केली गेली तेव्हा समजलं की, मृतदेह सूरज गुप्ताचा आहे आणि फिरोज जिवंत आहे.
10 नोव्हेंबरला करछना पोलीस आणि एसओजीच्या संयुक्त टीमला गुप्त सूचना मिळाली की, गावातील ढाब्याजवळ फिरोज एका स्कूटीने कुठे जाताना दिसला. नंतर पोलिसांनी काही ठिकाणी बंदोबस्त लावला. फिरोजला येताना पाहून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्याने फायरिंग केली आणि तो पळाला. पोलिसांनी फायरिंग केल्यावर त्याच्या पायाला गोळी लागली आणि तो पडला. पोलिसांनी त्याच्याकडून स्कूटी आणि पिस्तुल जप्त केलं. त्याला नंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पुढील कारवाई सुरू आहे.