पूर्ववैमनस्यातून एकाची डोक्यावर दांडा मारून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 09:56 AM2020-06-09T09:56:10+5:302020-06-09T09:58:37+5:30
एका युवकाने ४५ वर्षीय इसमाच्या डोक्यात लाकडी दांडा घालून हत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरात गेल्या १५ दिवसात एकाच दिवशी दोघांची हत्या होण्याची तिसरी घटना सोमवारी घडली. जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या हरिहरपेठमध्ये पूर्ववैमनस्यातून एका युवकाने ४५ वर्षीय इसमाच्या डोक्यात लाकडी दांडा घालून हत्या केली, तर दुसऱ्या घटनेत अकोट फैल परिसरातील भोईपुरा येथे किरकोळ वादातून झालेल्या धक्काबुक्कीत एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात एकाच दिवशी दोघांची हत्या झाल्याची ही तिसरी घटना आहे. गेल्या पंधरवड्यात खरब येथे दोघांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर बळवंत कॉलनीतील पती-पत्नीची अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती.
हरिहरपेठेतील सिद्धार्थ नगर येथील रहिवासी असलेल्या मंगेश ऊर्फ मुन्ना यादव ४५ यांचा याच परिसरातील रहिवासी वैभव लक्ष्मण काळभागे यांच्यात गत अनेक दिवसांपासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू होता. सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मंगेश यादव हे सितला माता मंदिराच्या एका ओट्यावर बसलेले असताना वैभव काळभागे या आरोपीने त्याची आई कविता लक्ष्मण काळभागे हिच्या मदतीने मंगेशच्या पाठीमागून येऊन त्याच्या डोक्यात सेंट्रिंगसाठी वापरण्यात येत असलेला लाकडी दांडा (बल्ली) घातला. त्यामुळे मंगेश काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. या घटनेची माहिती तातडीने जुने शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून गंभीर अवस्थेत असलेल्या मंगेशची पाहणी केली असता त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यानंतर घटनास्थळी पंचनामा करून मंगेश यादव यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. मंगेशची हत्या करणारा वैभव काळभागे घटनास्थळावरून फरार झाला; मात्र स्थानिक गुन्हे शाखा तसेच जुने शहर पोलिसांनी आरोपींचा तातडीने शोध सुरू करून त्याला काही तासाच्या आतच गायगाव शेतशिवरातून ताब्यात घेतले.
या हत्याकांडामध्ये आणखी एक आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. याप्रकरणी मृतकाची पत्नी ममता मंगेश यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी वैभव काळभागे याच्या विरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.