तडीपार गुंडाकडून पोलीस हवालदारचा खून; पुण्यातील बुधवार पेठेतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 08:00 AM2021-05-05T08:00:12+5:302021-05-05T09:58:08+5:30
पुणे : तडीपार गुंडाकडून मध्यरात्री पोलीस हवालदारवर चाकूने वार करुन खुन केल्याची घटना समोर आली आहे. बुधवार पेठेतील श्रीकृष्ण ...
पुणे : तडीपार गुंडाकडून मध्यरात्री पोलीस हवालदारवर चाकूने वार करुन खुन केल्याची घटना समोर आली आहे. बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजवळ मध्यरात्री सव्वा बारा वाजता हा प्रकार घडला. पोलीस हवालदार समीर सय्यद समीर सय्यद (वय ४८, रा. खडक पोलीस वसाहत) असे खुन झालेल्या पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तडीपार गुंड प्रवीण महाजन (वय ३४, रा. कसबा पेठ) याला अटक केली आहे.
प्रवीण महाजन याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांनी आतापर्यंत त्याला दोनदा तडीपार केले आहे. असे असतानाही त्याची गुंडगिरी थांबली नव्हती. पोलीस हवालदार समीर सय्यद हे सध्या फरासखाना पोलीस ठाण्यात नियुक्तीवर होते. काल रात्री ते ड्युटीवरुन घरी जात होते. त्यावेळी श्रीकृष्ण टॉकीजजवळ त्यांना प्रवीण महाजन दिसला. त्यावरुन त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी प्रवीण याने त्याच्याकडील चाकुने सय्यद यांच्यावर वार केले. त्यातील एक वार गळ्यावर लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरु झाला. हे पाहून तेथे असलेल्या लोकांनी प्रवीण याला पकडले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी सय्यद यांना केईएम हॉस्पिटलमध्ये नेले. गळ्यावर वार झाला असल्याने त्यातच त्यांचा मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रवीण महाजन याला अटक केली आहे.