ठाणेदारासह पाच पोलिसांवर खुनाचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 08:20 AM2021-05-29T08:20:40+5:302021-05-29T08:22:16+5:30
Crime News: आमगाव न्यायाधीशांच्या उपस्थितीत सीआयडीने प्रत्यक्षदर्शी सुरेश राऊत व राजकुमार मरकाम यांचे जबाब नोंदविले. मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याचे त्यांनी म्हटले.
- नरेश रहिले
गोंदिया : आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आलेल्या चोरीच्या प्रकरणात अटकेतील आरोपी राजकुमार अभयकुमार (३०) याचा तुरुंगात बेदम मारहाणीमुळे मृत्यू झाल्याप्रकरणी आमगावच्या ठाणेदारासह पाच पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून दोन वेळा संगणक संच व एलसीडीची चोरी करणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० मे रोजी ताब्यात घेतले होते. त्यापैकी राजकुमार याला बेदम मारहाण झाल्यानेच त्याचा मृत्यू झाला.
त्याला जबाबदार आमगावचे ठाणेदार सुभाष सदाशिव चव्हाण (४१), सहायक पोलीस निरीक्षक महावीर शिवाजी जाधव (४०), ठाणेदाराचा वाहनचालक पोलीस हवालदार खेमराज मार्कंड खोब्रागडे (५२), पोलीस शिपाई अरुण उईके (३३) व दत्तात्रय कांबळे (३३) यांच्यावर सीआयडीचे पोलीस निरीक्षक विनोद वाकडे यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३०२, ३३०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमगाव न्यायाधीशांच्या उपस्थितीत सीआयडीने प्रत्यक्षदर्शी सुरेश राऊत व राजकुमार मरकाम यांचे जबाब नोंदविले. मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याचे त्यांनी म्हटले.