Murder Case : सुरक्षारक्षकाच्या हत्येचा आठ तासात छडा; तिघांपैकी एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 04:49 PM2022-06-16T16:49:51+5:302022-06-16T16:50:27+5:30

Murder Case : चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगारवाल्यालाही बेडया

Murder Case: Murder of a security guard in eight hours; One of the three was arrested | Murder Case : सुरक्षारक्षकाच्या हत्येचा आठ तासात छडा; तिघांपैकी एकाला अटक

Murder Case : सुरक्षारक्षकाच्या हत्येचा आठ तासात छडा; तिघांपैकी एकाला अटक

Next

डोंबिवली: पूर्वेकडील एमआयडीसी फेज १ मधील विजय पेपर मिल मधील सुरक्षारक्षक ग्यानबहादुर भिमबहादुर गुरूम याची चोरीच्या उद्देशाने हत्या करणा-या तिघा आरोपींपैकी एकाला  अटक करण्यात मानपाडा पोलिसांना यश आले. विशेष बाब म्हणजे आरोपींमध्ये रिक्षाचालकाचा समावेश असून त्याच्यासह चोरीचे भंगार सामान खरेदी करणा-या भंगारवाल्याला बेडया ठोकण्यात आल्या आहेत. गुन्हयात वापरण्यात आलेल्या रिक्षावर असलेल्या बॅनरवरून या हत्येचा आठ तासात छडा लावण्यात आला आहे.


बुधवारी सकाळी सुरक्षारक्षक ग्यानबहादुरचा मृतदेह मिल बाहेर रक्ताच्या थारोळयात आढळला होता. या गुन्हयाच्या तपासकामी सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे, मानपाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक बाळासाहेब पवार, अनिल पडवळ, सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश वनवे, अनिल भिसे, सुरेश डांबरे, सुनिल तारमळे आदिंची पथके गठीत केली होती. मिल लगतच्या परिसरातील  सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता मिलमध्ये तिघांनी प्रवेश केल्याचे आणि भंगार चोरी केल्यावर ते रिक्षातून गेल्याचे दिसले. त्या रिक्षाच्या मागे चिकटवलेले पोस्टर कापलेल्या अवस्थेत होते. त्या पोस्टरच्या आधारे तपासाची चक्रे फिरविण्यात आली. पोलिस पथकातील पोलिस नाईक प्रशांत वानखेडे आणि पोलिस शिपाई संतोष वायकर यांना गस्ती दरम्यान पोस्टर कापलेल्या अवस्थेतील रिक्षा निदर्शनास पडली असता त्यांनी ती अडवली. परंतू रिक्षाचालक न थांबता पळून जाऊ लागला असता त्याला दोघांनी पाठलाग करून पकडले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने दोन साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. टोनी थॉमस डिसिल्व्हा उर्फ शिवा सोमा हिलम (वय ३०) असे अटक रिक्षाचालकाचे नाव असून तो हत्येच्या गुन्हयातील प्रमुख आरोपी आहे. चोरी केलेले भंगाराचे सामान खरेदी करणारा भंगारवाला फिरोज इस्माईल खान (वय ३०) यालाही पोलिसांनी अटक केली. गुन्हयात वापरलेली रिक्षाही जप्त करण्यात आली आहे. गुन्हयातील आणखीन दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक बागडे यांनी सांगितले.

दिवसा रिक्षाचा धंदा; रात्री चोरी
टोनी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधीचे चार गुन्हे दाखल आहेत. तो दिवसा भाडयाने रिक्षा चालवायचा आणि रात्री साथीदारांच्या मदतीने चो-या करायच्या असेही तपासात उघड झाले आहे.

Web Title: Murder Case: Murder of a security guard in eight hours; One of the three was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.