संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 02:50 PM2024-09-30T14:50:15+5:302024-09-30T15:00:59+5:30

३० वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा सांगाडा घराच्या अंगणात सापडला आहे. सांगाडा सापडल्यानंतर गावातील लोकांसह पोलीसही हैराण झाले आहेत.

murder case revealed after 30 years in hathras up dead body found in the house | संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य

फोटो - zeenews

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात ३० वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा सांगाडा घराच्या अंगणात सापडला आहे. सांगाडा सापडल्यानंतर गावातील लोकांसह पोलीसही हैराण झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या गुरुवारी हाथरसच्या गिलौंदपूर गावात एका घरात मानवी सांगाडा सापडला होता. हा सांगाडा १९९४ मध्ये बेपत्ता झालेल्या बुध सिंह यांचा आहे. मुलगा पंजाबी सिंह याने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

हाथरसचे जिल्हाधिकारी रोहित पांडे यांच्या कार्यालयात दाखल केलेल्या तक्रारीत पंजाबी सिंहने ३० वर्षांपूर्वी आपल्या वडिलांची हत्या झाल्याचा आरोप केला होता. ही हत्या त्याचे दोन मोठे भाऊ आणि त्याच गावातील एक व्यक्ती यांनी केली होती. यानंतर वडिलांचा मृतदेह त्यांच्याच घरात पुरण्यात आला. तक्रार आल्यानंतर डीएमने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. यानंतर गेल्या गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या उपस्थितीत खोदकाम सुरू असताना एक सांगाडा सापडला.

मुरसान पोलीस स्टेशनचे प्रभारी विजय कुमार सिंह यांनी सांगितलं की, पंजाबी सिंहची आई, दोन मोठे भाऊ आणि त्याच गावातील रहिवासी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. विजय कुमार सिंह यांनी सांगितलं की, बुध सिंह यांच्या मृत्यूवेळी पंजाबी नऊ वर्षांचा होता. उत्खननादरम्यान घरातून सापडलेला सांगाडा पोस्टमार्टम आणि डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आल्याचं पोलीस स्टेशन प्रभारींनी सांगितलं. 

बुध सिंह १९९४ मध्ये त्यांच्या घरातून बेपत्ता झाले आणि ते परत आलेच नाहीत. पंजाबी सिंह यांनी पोलिसांना सांगितलं की, ३० वर्षांपूर्वी जून १९९४ मध्ये वडील आणि मोठ्या भावांमध्ये काही कारणावरून भांडण झालं होतं. वडिलांच्या बेपत्ता होण्यामागे आपल्या भावांचा हात असल्याचा त्याला संशय होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबी सिंहला असाही संशय आहे की आपल्या भावांनी वडिलांची हत्या केल्यानंतर मृतदेह घरात पुरला होता. 
 

Web Title: murder case revealed after 30 years in hathras up dead body found in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.