धक्कादायक... दीड कोटीच्या विम्यासाठी मित्राला कारसह पेटविले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 04:09 AM2020-01-25T04:09:41+5:302020-01-25T09:54:47+5:30
दीड कोटीच्या विम्यासाठी तरुणाने स्वत:च्या खुनाचा बनाव रचून आपल्या जीवलग मित्राला संपविल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.
कोरेगाव/वाठार स्टेशन (सातारा) - दीड कोटीच्या विम्यासाठी तसेच मुंबईतील व्यवसायात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सुमित मोरे (३०, रा. महिमानगड, ता. माण) याने स्वत:च्या खुनाचा बनाव रचून आपला जीवलग मित्र तानाजी आवळे (२८) याला संपविल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. अवघ्या चार दिवसांत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.
सुमित मोरे हा मुंबई येथे वास्तव्यास आहे. सोमवारी रात्री तो कारने मुंबईला निघाला होता. बोधेवाडी घाटात अज्ञाताने त्याचा खून करून कार त्याच्यासह पेटवून दिली. हा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. वाठार पोलिसांच्या तपासात मात्र धक्कादायक माहिती समोर येऊ लागली.
सुमित आई-वडिलांसह तो मुंबईतील सायन-कोळीवाडा येथे राहत होता. त्याने प्रोटीन पावडर विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. व्यवसायात त्याला नुकसान झाले. त्याचवर कर्जही झाले. कर्ज फेडण्यासाठी त्याने मुंबईतील आपल्या मित्राच्या साह्याने एका खासगी बँकेतून स्वत:चा दीड कोटी रुपयांचा विमा उतरविला होता. स्वत:चा अपघाती मृत्यू भासवायचा आणि विमा रक्कम घेऊन पळून जाण्याचा कट त्याने रचला होता. त्याने उर्किडे (ता. माण) येथील मित्र तानाजी आवळे याला लक्ष्य करण्याचे ठरविले. तानाजीची शरीर यष्टी हुबेहूब सुमितसारखीच होती. त्यामुळे त्याचा खून करून, तो सुमित मोरे आहे, असे त्याला भासवायचे होते. सुमितने तानाजी याला ‘आपल्याला बाहेरगावी जायचे आहे, दहिवडीमध्ये ये,’ असा निरोप दिला. तानाजीला घेऊन तो निघाला. कार बोधेवाडी घाटात पोहोचल्यानंतर त्याच्या डोक्यावर लाकडी स्टंम्पने वार केला, त्यात तानाजीचा जागीच मृत्यू झाला.
मुलगा गेला तरी ...
सुमितचे कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक यांच्या चेहऱ्यावर पोलिसांना दु:ख दिसत नव्हते. सर्व जण तणावात असल्याचे दाखवत होते. मात्र त्यांची देहबोली वेगळीच होती. उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही. भावाकडे चौकशी करण्यास सुरुवात केल्यावर तो गडबडला आणि पोलिसांपुढे सर्व हकीकत सांगितली. सुमित हा जेजुरी येथे असल्याचे त्याने सांगितले.