नागपुरातील गिट्टीखदानमध्ये गुन्हेगाराची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 11:39 PM2020-07-16T23:39:54+5:302020-07-16T23:40:59+5:30
गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीतील पंचशीलनगरात एका गुन्हेगाराची हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी रात्री ७ वाजता घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीतील पंचशीलनगरात एका गुन्हेगाराची हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी रात्री ७ वाजता घडली. सचिन अलोने (४०) रा. पंचशीलनगर असे मृताचे नाव आहे. सचिन जुना गुन्हेगार आहे. मागील काही दिवसात त्याचे गुन्हेगारी कृत्य कमी झाले होते. घटनेच्या वेळी तो पंचशील चौकात आपल्या भावासोबत बसला होता. त्याचवेळी दोन आरोपी बाईकवर आले. त्यांनी सचिनवर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्याला रुग्णालयात भर्ती करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
असे सांगितले जाते की, सचिनची हत्या राजनगर झोपडपट्टी येथील आकाश भोंगेने केली. आकाशचे मामा रतन राऊत यांच्यासोबत काही दिवसापासून सचिनचा पैशावरून वाद सुरू होता. बुधवारीसुद्धा त्यांचा वाद झाला. यानंतर रतनने हारपीकचे सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मेयो रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहे. गुरुवारी आकाश मामाला भेटायला रुग्णालयात गेला होता. तेव्हा त्याला सचिनसोबत असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजले. तो संतापून सचिनला शोधत आपल्या साथीदारासोबत पंचशील चौकात पोहोचला. तिथे त्याला सचिन भेटला. माझ्या मामाला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप करीत वाद घातला. तसेच चाकूने वार करून त्याची हत्या केली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरु होती.