चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीचा गळा कापून खून, शिरूर येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 11:33 PM2020-07-27T23:33:12+5:302020-07-27T23:33:45+5:30
आरोपीने पोलीस ठाण्यात जाऊन दिली खुनाची कबुली
शिरूर : वाडा कॉलनी येथे चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीचा चाकूने गळा कापून खून केल्याची खळबळ जनक घटना सोमवारी उघडकीस आली. खून केल्यानंतर आरोपीने स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सारिका सुदाम गिरमकर (वय ३०, रा. कुऱ्हाडवाडी, निमोणे ता. शिरूर) खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर दत्तात्रय गेनभाऊ गायकवाड (वय ३३ रा. वाडाकॉलनी, शिरूर, मूळगाव शिंदोडी, ता. शिरूर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी याबाबत वाडा कॉलनी येथील घरमालक बबन पर्वतराव शेटे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , दत्तात्रय गायकवाड आणि सारिका गिरमकर हे दोघेजण जानेवारीपासून वाडा कॉलनी येथील शेटे यांच्या खोलीत भाड्याने राहत होते. परंतु काही दिवसांपासून दत्तात्रय गायकवाड हा सारिका हिच्या चारित्र्याचा संशय घेऊ लागला. यावरून त्यांच्या दोघात अनेकवेळा भांडणे झाली होती. मात्र, सोमवारी दोघांतील वाद टोकाला गेला. मध्यरात्री पावने दोनच्या सुमारास सारिका ही झोपली असताना दत्तात्रय याने सारिकाचा चाकूने गळा कापून तिचा निर्घृणपणे खून केला. खून केल्यानंतर दत्तात्रय गायकवाड कारेगाव येथे कंपनीत कामाला निघून गेला. त्यानंतर तो पुन्हा सकाळी शिरूर येथे येऊन पोलीस ठाण्यात गेला. त्याठिकाणी त्याने सारिकाचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. दत्तात्रय गेनभाऊ गायकवाड याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बिरदेव काबुगडे हे करीत आहे.