मुलगी, मुलाची हत्या; मृतदेह लटकवले झाडाला, मुलीच्या वडिलांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 08:43 AM2021-09-23T08:43:14+5:302021-09-23T08:43:28+5:30
गेल्या सहा महिन्यांत जामुई जिल्ह्यात अशाप्रकारे हत्या होण्याचा हा दुसरा प्रकार आहे. मुलगी व मुलगा एकाच समाजाचे असल्याचे पोलीस म्हणाले.
जामुई : बिहारमधील जामुई जिल्ह्यातील जंगलात मंगळवारी किशोरवयीन मुलगी आणि मुलाचा मृतदेह झाडाला लटकताना आढळला. या दोघांच्या संबंधांना मुलीच्या कुटुंबाची मान्यता नसल्यामुळे त्यांनी या दोघांना ठार मारले, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
गेल्या सहा महिन्यांत जामुई जिल्ह्यात अशाप्रकारे हत्या होण्याचा हा दुसरा प्रकार आहे. मुलगी व मुलगा एकाच समाजाचे असल्याचे पोलीस म्हणाले.
जामुईचे पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार मंडल यांनी या हत्याप्रकरणी मुलीच्या वडिलांना अटक केली तर इतर आरोपी फरार आहेत, असे सांगितले. प्राथमिक चौकशीच्या आधारे मंडल म्हणाले की, या हत्येत मुलीच्या तीन मेहुण्यांचा सहभाग असल्याचे सूचित होते कारण हे तिन्ही मेहुणे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. आरोपींनी मुलगी व मुलाला ठार मारण्याचा कट रचला नव्हता, असे सांगून मंडल म्हणाले की,‘मुलीचे वडील व इतरांनी मुलीला मुलासोबत पाहिले आणि तिच्या भांगेत भडक कुंकू पाहिल्यावर त्यांना राग अनावर झाला व हत्या घडली.’ मुलगी व मुलगा लग्न करण्यासाठी मंदिरात गेले होते. काही ग्रामस्थांनीही त्यांना पाहिल्यावर मुलीच्या वडिलांना तसे सांगितले. तिचे वडील व इतर नातेवाईक त्यामुळे संतापले. त्यांनी त्या दोघांना शेतात ओढत नेले व त्यांचा गळा दाबला व मृतदेह झाडाला लटकावले, असे पोलीस म्हणाले.
दोघेही बोर्ड परीक्षा उत्तीर्ण
- मुलगी व मुलाने यावर्षी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. सोमवारी ते दोघे घरातून बाहेर पडले व नंतर एकाच कपड्याने ते झाडाला लटकताना आढळले.
- मुलीची आई म्हणाली की, ती काही कामानिमित्त घरातून बाहेर गेली होती, तर मी मुलाला साखर आणण्यासाठी पाठवले होते, असे मुलाची आजी म्हणाली. या हत्यांनंतर त्या भागात बुधवारी बंद पाळला गेला. सर्व संशयितांना अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.