राजकीय वर्चस्वाच्या स्पर्धेतून दीपक मारटकर यांचा खून; आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 08:13 PM2020-10-03T20:13:20+5:302020-10-03T20:17:22+5:30

अश्विनी कांबळे व महेंद्र सराफ यांचे दीपक मारटकर यांच्याशी राजकीय वैमनस्य होते.

Murder of Deepak Maratkar in a contest for political supremacy | राजकीय वर्चस्वाच्या स्पर्धेतून दीपक मारटकर यांचा खून; आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी

राजकीय वर्चस्वाच्या स्पर्धेतून दीपक मारटकर यांचा खून; आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी

googlenewsNext

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीची तयारी आतापासून सुरु झाली आहे. त्यामुळेच राजकीय वर्चस्वाच्या स्पर्धेतून शिवसेनेचे विभाग प्रमुख दीपक मारटकर यांचा कट रचून खून केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना-भळगट यांनी ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
         अश्विनी सोपान कांबळे (वय २५, रा. बुधवार पेठ), महेंद्र मदनलाल सराफ (वय ५७, रा.बुधवार पेठ) आणि निरंजन सागर म्हंकाळे (वय १९, रा. गवळी वाडा, बुधवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
         शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेतील गवळी आळीसमोर टोळक्याने दीपक मारटकर यांच्यावर वार करुन त्यांचा खून केला. या प्रकरणात सनी कोलते, संदीप ऊर्फ मुंगळ्या कोलते (रा. सुखसागरनगर), रोहित ऊर्फ बाळा कांबळे, राहुल ऊर्फ पांड्या रागीर (रा. लोहियानगर), लखन ऊर्फ आण्णा धावर (रा. पंढरपूर) आणि रोहित क्षीरसागर (रा. गंज पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक केलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर केले. निरंजन हा मारटकर यांच्या शेजारी राहण्यास असून त्याने दीपक यांची प्रत्येक हालचालीची माहिती आरोपींना पुरविली. फरार आरोपीबरोबर घटना घडण्यापूर्वी निरंजन असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरुन दिसून येते. 

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, अश्विनी व महेंद्र यांचे मारटकर यांच्याशी राजकीय वैमनस्य होते. त्यांच्यात आणखी काही वाद होता का याचा तपास करायचा असल्याचे सहायक सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी सांगितले. न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी मंजूर केली.
महेंद्र सराफ आणि विजय मारटकर हे दोघेही शिवसेनेत होते. त्यांचे १९९८ पासून राजकीय वैमनस्य होते. मागील महापालिका निवडणुकीत अश्विनी कांबळे व मारटकर हे परस्परविरोधात उभे होते. सध्या कोरोनाच्या काळात दीपक मारटकर यांनी आपला जनसंपर्क वाढविला होता. परिसरातील वर्चस्वातून दीपकचा काटा काढण्यासाठी आरोपींनी कट रचला असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरु आहे. 

Web Title: Murder of Deepak Maratkar in a contest for political supremacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.