गाडीचे किलोमीटर वाढल्याने दुहेरी खूनाचा उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 06:01 PM2018-10-01T18:01:36+5:302018-10-01T18:02:40+5:30
बुलडाणा: खडका शिवारात लातूर जिल्ह्यातील शिंदी जवळगा येथील मधुकर घोलप आणि परमेश्वर घोलप यांच्या खूनाचा उलगडा करण्यात भाड्याने घेतलेल्या गाडीचे ३०० ऐवजी ८५८ किमी अंतर झाल्यामुळे पोलिसांना यश मिळाले आहे.
बुलडाणा: खडका शिवारात लातूर जिल्ह्यातील शिंदी जवळगा येथील मधुकर घोलप आणि परमेश्वर घोलप यांच्या खूनाचा उलगडा करण्यात भाड्याने घेतलेल्या गाडीचे ३०० ऐवजी ८५८ किमी अंतर झाल्यामुळे पोलिसांना यश मिळाले आहे. विशेष म्हणजे ज्या संस्थेवरील नोकरीच्या वादातून हे खून झाले त्यातील मृत मधुकर घोलप आणि संस्थाध्यक्ष गोरख शिंदे हे नात्याने साले-मेव्हणे आहेत. सध्या गोरख शिंदे फरार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. मधुकर घोलप व परमेश्वर घोलप यांच्या खूनासाठी वापरण्यात आलेली गाडी ही भाड्याने घेण्यात आली होती. देवदर्शनासाठी नांदेड येथे जावयाचे असल्याचे सांगून ती भाड्याने घेण्यात आली होती. मात्र आरोपी संदीप पाबळे, शेख मुस्तफा उस्मान साब यांनी दोघा घोलपांना घेऊन बुलडाणा जिल्ह्यातील राहेरी बुद्रूक गाठले. राहेरी बुद्रूक येथील तिसरा आरोपी मधुकर मारोती लहाने याच्या सोबत शेख मुस्तफाने पूर्वी काम केलेले होते. त्यामुळे त्याला संपर्क करून मद्य व जेवणाची तयारी त्यांनी करवून घेतली होती. सोबतच लहानेकडून दोन लाख रुपये घ्यावयाच्या बहाण्याने ही मंडळी बुलडाणा जिल्ह्यात आली होती. त्यातच पाबळेने त्याचा मोबाईल गावातच लॉन्ड्रीमध्ये चार्जिंगला लावून ठेवला होता. गाडी मालकाला दुसरीकडे गाडी भाड्याने पाठवावयाची असल्याने त्याने पाबळेला फोन केला असता तो लॉन्ड्री मालकाने उचलला. व पोलिसांच्या नजरेतून तंत्रज्ञानामुळे ही बाब सुटली नाही. पोलिसांनी सुतावरून धागा पकडत पुढील माहिती काढली असता गाडीचे किलोमीटर वाढल्यावरून त्यांना संशय आला आणी पुढील बाबींचा उलगडा झाल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. दरम्यान, या खुनासाठी वापरण्यात आलेली ही गाडीही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतली आहे.
आधी मधुकर घोलपचा झाला खून
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहेरी बुद्रूक शिवारात जेवण व मद्यपान झाल्यानंतर लहानेकडून दोन लाख रुपये घेऊन येण्याच्या बहाण्याने मधुकर घोलपला परिसरात दुसर्या ठिकाणी नेण्यात आले. तेथे त्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे पोलिस सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नंतर त्याचा मृतदेह गाडीच्या डिक्कीत टाकून गाढ झोपेत असलेल्या परमेश्वर घोलपचा खून करण्यात आला असल्याचे तपासी अधिकार्यांचे म्हणणे आहे.