पुणे : मैत्रिणीला अपशब्द वापरल्याच्या रागातून मित्रांनीच केला खून ; चार जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 03:11 PM2020-10-19T15:11:13+5:302020-10-19T15:12:22+5:30
सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे २४ तासाच्या आत पोलिसांनी आरोपींना अटक केली.
पुणे ( खडकवासला ) : मैत्रिणीला अपशब्द वापरल्याच्या रागातून मित्रांनी मित्राला मारहाण करुन त्याचा काटा काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यश मिलिंद कांबळे (वय १८, रा. नांदेड) याच्या खुनाचे गुढ उकलण्यात हवेली पोलिसांना यश आले असून त्यांनी चौघांना अटक केली आहे.
मदन शाम गेंटाल (वय २४,रा. गिताजली अपार्टमेंट, नांदेड फाटा, सिंहगड रोड ), चमन नईम बागवान (वय १८, रा. गौरी बिल्डींग,
सावंत पार्क, नांदेड, तालुका हवेली), सुमित गंगाधर शेजवळ (वय २२, रा. शेजवळ हाईट्स, नांदेड), आकाश दत्तात्रय घाडगे( वय २०, रा़ मातोश्री निवास, नांदेड) अशी अटक करण्यात आलेल्या आलेल्या आरोपींचे नाव आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आकाश घाडगे याला ताब्यात घेतल्यानंतर डीएसके विश्व येथे लपुन बसलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश कांबळे याचा मृतदेह नांदेड फाटा येथे शनिवारी सकाळी आढळून आला होता. मदन शाम गेंटाल याचे नांदेड फाट्याजवळ राहणाऱ्या एका मुलीबरोबर प्रेम सबंध आहे. तीच मुलगी मला भेटत असल्याचे यश कांबळे याने काही दिवसांपूर्वी चमन बागवान याला सांगितले होते. ही माहिती चमन याने मदन गेंटाल, सुमित शेजवळ आणि आकाश घाडगे याला सांगितले. शनिवारी रात्री एकच्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या चौघांनी यश कांबळे यास नांदेड फाटा येथे बोलवून घेतले. त्यानंतर पाचही जण समीर शेजवळ याच्या नांदेड फाट्याजवळ असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गेले. दारूच्या नशेत असलेल्या चौघांनी यश कांबळे यास लाकडी दांडक्याने आणि हाताने जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. जीव वाचवण्यासाठी यशने चौथ्या मजल्यावरून उडी मारली. त्यात जबर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यु झाला़ यशची हालचाल थांबल्याचे पाहून आरोपी फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक शेळके तातडीने सहायक पोलिस निरीक्षक नितीन नम, पोलीस उपनिरिक्षक ॠतुजा मोहिते, पोलीस नाईक रामदास बाबर, संजय शेंडगे, गणेश धनवे, राजेंद्र मुंडे, संतोष भापकर, दिनेश कोळेखर, विश्वास मोरे व होमगार्डचे जवान यांचेसह घटनास्थळी दाखल होउन तपास सुरु केला. पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाला गती दिली.
सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे २४ तासाच्या आत पोलिसांनी आरोपींना अटक केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सई भोरे पाटील अधिक तपास करत आहेत.