लिव्ह इन रिलेशनमधून हत्या; भिवंडीत महिलेच्या हत्येप्रकरणी दोघांना उत्तरप्रदेश येथून अटक
By नितीन पंडित | Published: August 2, 2022 09:10 PM2022-08-02T21:10:41+5:302022-08-02T21:11:12+5:30
Murder Case : नारपोली पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून अटक केली असल्याची माहिती मंगळवारी दिली आहे.
नितिन पंडीत
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील वळ पाडा येथील पारसनाथ कंपाऊंड या गोदाम संकुलात ब्लॅंकेटमध्ये गुंडाळून गटारीत फेकून दिलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाच्या गुन्ह्याचा तपास करण्यात नारपोली पोलिसांना यश आले असून अनोळखी असलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे .नफिसा मटरु शाह उर्फ संगीता भाभी वय २५ असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून तिच्या सोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या सत्यम सुरेश सिंग वय २४ व त्याचा साथीदार अवधेश श्यामसिंग शैगर वय ३५ यांना नारपोली पोलिसांनीउत्तर प्रदेश येथून अटक केली असल्याची माहिती मंगळवारी दिली आहे.
२६ जुलै रोजी वळपाडा येथीप पारसनाथ कंपाऊंड येथील एका गोदामा नजीकच्या गटारीत एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. नारपोली पोलिसांनी अज्ञातां विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला.सुरवातीला महिलेची ओळख पटली नसताना या भागातील एका व्यक्तीने तो मृतदेह संगीत भाभी हीच असल्याचा सांगत ती सत्यम सिंग या सोबत राहत असल्याचे सांगितले .सदर महिला ही विवाहती असून पती सोबत पटत नसल्याने ती सत्यम सिंग बरोबर लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहत असताना सुरवातीला सुरत व तेथून पुन्हा भिवंडी येथे राहण्यास आली होती अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांना मिळताच त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सत्यमचा शोध घेतला असता तो मृतदेह सापडलेल्या परिसरातील गोदामात काम करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली,त्याचा शोध घेत पोलीस त्याच्या कामाच्या ठिकाणी पोहचले असता सत्यम सिंग व त्याचे मित्र अवधेश, सुमित,मुकेश व विशाल असे कामवर येत नसल्याचे सांगितल्याने पोलिसांचा संशय बळावला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ ,पो निरीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पाटील व पोना जाधव, पाटील, बंडगर या पथकाने तांत्रिक कौशल्याने तपास केला असता सत्यम सिंग हा उत्तर प्रदेश येथे निघून गेल्याचे निष्पन्न झाले असता हे पोलीस पथक उत्तर प्रदेश राज्यातील रसुलाबाद, फत्तेपुर या ठिकाणी दाखल होत स्थानिक पोलिसांच्या मदतीने सत्यम सुरेश सिंग व त्याचा साथीदार अवधेश श्यामसिंग शैगर यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली.कोणताही पुरावा नसताना माहितीच्या आधारे तांत्रिक तपास करीत आरोपीस अटक करण्यात नारपोली पोलिसांना यश मिळाले असून या दोन्ही आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता १०ऑगष्ट पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिली आहे .