काचेने हल्ला करून केली हत्या, दोघांना अटक; किरकोळ वादातून केले कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 01:10 AM2020-03-14T01:10:45+5:302020-03-14T01:11:19+5:30
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला गाडे खाली कोसळला. त्यानंतर दोन्ही हल्लेखोरांनी घटनास्थळाहून पळ काढला. गाडेला त्याच्या मित्रांनी तातडीने रिक्षात बसवून डॉन बॉस्को शाळेजवळील रुग्णालयात हलविले.
मुंबई : किरकोळ वादात एका तरुणावर काचेने जीवघेणा हल्ला करून त्याची हत्या करण्याचा प्रकार गुरुवारी संध्याकाळी बोरीवलीत घडला. या प्रकरणी शुक्रवारी दोघांना पोलिसांनी अटक केली.
अजय शिंदे (२२) व बबलू सूर्यवंशी (२०) अशी अटक आरोपींची नावे आहेत. १२ मार्च रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास बोरीवली पश्चिमेच्या फर्निचर गल्ली, बीईएसटी कॉलनी येथे लक्ष्मण संतोष गाडे (१८) हा त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. त्याचवेळी तिथे शिंदे आणि सूर्यवंशी आले. शिंदेच्या हातात असलेली काच सूर्यवंशीने गाडेच्या मानेत घुसवली. तर शिंदे याने हाताने गाडेच्या पोटावर व छातीवर ठोसे मारले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला गाडे खाली कोसळला. त्यानंतर दोन्ही हल्लेखोरांनी घटनास्थळाहून पळ काढला. गाडेला त्याच्या मित्रांनी तातडीने रिक्षात बसवून डॉन बॉस्को शाळेजवळील रुग्णालयात हलविले. मात्र त्याची अवस्था गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री १० वाजता गाडेचा मृत्यू झाला. या प्रकरणी बोरीवली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आणि दोघांना अटक केली. दोन दिवसांपूर्वी गाडे आणि मारेकऱ्यांमध्ये वाद झाला होता. त्याच रागात त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.