मटका बुकीचा खून 30 लाखांच्या खंडणीसाठी, अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहात रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 12:44 AM2018-11-07T00:44:30+5:302018-11-07T00:45:09+5:30
बारामती शहरातील मटका बुकीचा खून ३0 लाखांच्या खंडणीसाठी करण्यात आल्याचे उघड झाले असून, या खूनप्रकरणी चौघा अल्पवयीन आरोपींसह १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती - शहरातील मटका बुकीचा खून ३0 लाखांच्या खंडणीसाठी करण्यात आल्याचे उघड झाले असून, या खूनप्रकरणी चौघा अल्पवयीन आरोपींसह १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ सज्ञान आरोपींपैकी ३ जणांना अटक करण्यात आली आहे. तर इतर १० आरोपी फरारी झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीचा समावेश आहे. जाधव याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कृष्णा महादेव जाधव (वय ५०) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सपना कृष्णा जाधव (वय ४५, रा. नेवसे रोड, कै काड गल्ली, बारामती) हिने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव दांपत्य सोमवारी (दि. ५) दुपारी १२.३० वाजता येथील समता नागरी पतसंस्थेत गेले होते. पत्नीला घरी सोडून ते दुपारी १ वाजण्याच्या सुमारास चालक प्रभाकर पवार याला रुग्णालयात भेटण्यासाठी गेले. त्यानंतर १० ते १५ मिनिटांनी मुकेश पवार याने घरी येवुन त्याच्यावर हल्ला झाल्याचे सांगितले. यावेळी मुलगा प्रेम व पत्नी सपना यांनी घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जाधवला सिल्व्हर जुबिली रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आरोपींनी मागितलेली ३० लाख रुपयांची खंडणी न दिल्याने जाधव यास आरोपी संदीप दत्तुु माने (वय ३४, रा. प्रगतीनगर,बारामती), दिनेश रावसाहेब उर्फ पांडुरंग वायसे (वय ४०, रा. पाहुणेवाडी, ता. बारामती), रवि दिनकर माकर (वय ३४, रा. कै काड गल्ली, बारामती), विनोद शिवाजी माने, गणेश विठ्ठल माने, अनिल संभाजी माने, सुनील संभाजी माने, प्रेम दिनेश वायसे, अविनाश जाधव, संदीप जाधव, मोठा बिट्या उर्फ सचिन रमेश जाधव, लोकेश परशुराम उर्फ दत्तात्रय माने, गुलाब उत्तम माने यांच्यासह राष्ट्रवादीच्यांनी संगनमत करुन कट केला. कट करुन एकटे गाठुन पतीचा खुन केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद केले आहे. यामध्ये विनोद माने हा राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा पती आहे. यातील संदीप माने, दिनेश वायसे, रवी माकर यांना अटक करण्यात आली आहे. या तिघांना बारामती येथे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी ११ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अल्पवयीन हल्लेखोरांना सुधारगृहामध्ये पाठविले आहे. पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे, सहायक फौजदार दिलीप सोनवणे, अतुल जाधव पुढील तपास करीत आहेत.
अटक करण्यात आलेले अल्पवयीन आरोपी व्यसनाधीन आहेत. या आरोपींना व्हाईटनरसदृश द्रव्य हुंगणे, गांजा ओढण्याचे व्यसन असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. कृष्णा जाधव याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार इतर आरोपींनी या व्यसनाधीनतेतुन अल्पवयीन असलेल्या आरोपींना हाताशी धरुन मटका व्यावसायिक कृष्णा जाधव याचा खुन केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे. पोलीस याबाबत कसुन शोध घेत आहेत. त्यानंतरच आणखी सबळ माहिती यामध्ये पुढे येण्याची शक्यता आहे. यातील एका अल्पवयीन आरोपीचे वडील दौंड येथील न्यायालयात क्लार्क म्हणून काम करतात.
...हल्ला केल्यानंतर सत्तूर कालव्यात टाकला
कृष्णा जाधव यास रुग्णालयात येताना बोलण्यासाठी अडविले.त्यानंतर पाठीमागुन त्याच्या मानेवर सत्तुरने वार केले. त्याच्यावर वार केल्यानंतर अल्पवयीन मुलगी थेट शहर पोलीस ठाण्यात हजर झाली. त्यानंतर इतर तिघे अल्पवयीन आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाले. तत्पुर्वी या हल्लेखोरांनी सत्तुर, रक्ताने माखलेले कपडे निरा डावा कालव्यात टाकुन दिल्याची माहिती तपासात पुढे येत आहे. पोलिसांना हल्लेखोरांचा मोबाईल मिळाला आहे. वार करण्यासाठी वापरलेल्या सत्तुराचा पोलीस शोध घेत आहेत.