मुलीला त्रास का देतो असा जाब विचारल्याने सासूचा जावयाने केला खून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 09:07 PM2018-09-12T21:07:40+5:302018-09-12T21:07:55+5:30
घोडबंदर रोड येथील रूमा बाली सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावर अंकुश भट्टी (वय 32) आणि तरविंदर कौर (वय 38) हे दाम्पत्य राहत होते. तरविंदर कौर ही कर्णबधीर होती आणि घटस्फोटित होती. तिच्यापेक्षा वयाने सहा वर्ष लहान असलेल्या अंकुश भट्टीबरोबर तिचा दुसरा विवाह झाला होता.
ठाणे - लग्न झालेल्या आपल्या मुलीला का त्रास देतो याचा जाब जावयाला विचारला असता मुलीचा नवरा अंकुश धीरज भट्टी याने सासू कमलजीत कौर यांचा डोक्यात स्प्रे सिलेंडर मारून हत्या केली आणि कौर यांना इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खिडकीतून फेकून दिले. काल रात्री घोडबंदर कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली .
घोडबंदर रोड येथील रूमा बाली सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावर अंकुश भट्टी (वय 32) आणि तरविंदर कौर (वय 38) हे दाम्पत्य राहत होते. तरविंदर कौर ही कर्णबधीर होती आणि घटस्फोटित होती. तिच्यापेक्षा वयाने सहा वर्ष लहान असलेल्या अंकुश भट्टीबरोबर तिचा दुसरा विवाह झाला होता. तिची आई ही घोडबंदर येथे हिरानंदानी येथे रहायला होती. आपल्या कर्णबधिर मुलीच्या काळजीपोटी तिला रोज भेटण्यासाठी तिच्या घरी जात होती. तिचा नवरा अंकुश भट्टी हा तिला दारू पिऊन रोज मारहाण करत असे. काल रात्री 8:25 वाजता दारू पिऊन तो घरी आला होता. त्यावेळी तविंदर कौरची आई दुपारी दोन वाजताच मुलीची विचारपूस करण्यासाठी आली होती. अंकुश हा दारू पिऊन आल्यामुळे सासू आणि अंकुश यांच्या मध्ये भांडण सुरु झाले. भांडणामध्ये रागाने सासूने अंकुशच्या थोबाडीत मारली. त्या गोष्टीचा राग येऊन अंकुश याने बाजूला असलेल्या स्प्रेचा सिलेंडर उचलून तिच्या डोक्यावर मारला आणि तिला उचलून खिडकीतून खाली फेकले. इमारतीच्या खाली पोडियमचे काम चालू असल्यामुळे तिथे कोणाला प्रवेश नव्हता. तिला खाली फेकल्यानंतर अंकुश दरवाजा बंद करून बसला. त्याने आपल्या बायकोला दम देऊन गप्प बसायला लावले. तरविंदर कौरचा भाऊ मनजीत सिंग हा आपल्या आईला फोन करत होता. पण ती फोन उचलत नसल्यामुळे तो तरविंदरच्या घरी आला व दार ठोठावून सुध्दा बराच वेळ अंकुशने दार उघडले नाही. नंतर काही वेळाने अंकुश धावत धावत खाली गेला. सोसायटीच्या लोकांना जमा करून आपली सासू खिडकीतून पडल्याचे बनाव करू लागला. सगळेजण पोडियमच्या दिशेने गेले असता तिथे कमलजीत कौर उताणी पडल्या होत्या. तिला सगळ्यांनी मिळून तिला हॉस्पिटलमध्ये नेले. पण डॉक्टरांनी तिला म्रुत् घोषित केले. पोलिसांना याची खबर लागताच त्यांनी घटना स्थळांची पाहणी केली असता त्यांचा संशय अंकुशवर बळावला त्याच्या रुमची पाहणी केली असता दोन तिन ठिकाणी रक्ताचे डाग दिसले. त्यामुळे अंकुशने तिला मारहाण केल्याचे सिद्ध झाले. अंकुशकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व आपणच सासूला बेडरूमच्या खिडकीतून खाली फेकल्याचे सांगितले. त्यानुसार कासारवडवली पोलिसांनी अंकुशल अटक केली. न्यायालयाने त्याला १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.