थरारक! अनैतिक संबंध, विवाहित प्रेयसी अन् एका हत्येचं ‘विषारी’ षडयंत्र; पोलिसांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 08:53 AM2021-10-14T08:53:32+5:302021-10-14T08:54:59+5:30
नेहमीप्रमाणे रात्रीचं जेवण करून सुबोध देवी त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी गेल्या. परंतु सकाळ झाली तरी त्या अंथरुणातून उठल्या नाहीत.
नवी दिल्ली – हत्येच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. पण कधी कुणाचा जीव घेण्यासाठी सापाचा हत्यार म्हणून उपयोग करुन त्याच्या दंशाने समोरच्याचा काटा काढल्याचं ऐकलंय का? सुप्रीम कोर्टात आरोपीचा जामीन नाकारला गेला. कारण हे प्रकरणं खूपच गंभीर आहे. राजस्थानच्या झुंझनू इथं एका महिलेचा खून करण्यासाठी सापाचा वापर झाल्याचं समोर आल्याने सगळ्यांना धक्का बसला.
नेहमीप्रमाणे रात्रीचं जेवण करून सुबोध देवी त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी गेल्या. परंतु सकाळ झाली तरी त्या अंथरुणातून उठल्या नाहीत. सून अल्पना हैराण झाली. ती सासूच्या खोलीत पोहचली परंतु आतमधील दृश्य पाहून सूनेनं जोरजोरात किंकाळ्या फोडल्या. सासू अंथरुणात बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या तर खोलीच्या एका कोपऱ्यात साप वेटोळ्या घालून बसला होता. सूनेने तातडीने आसपासच्या लोकांना माहिती दिली. शेजाऱ्यांनी सुबोध देवीला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु शरीराची कुठलीही हालचाल झाली. तेव्हा लोकांनी त्यांना नजीकच्या हॉस्पिटलला पोहचवलं. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तर दुसरीकडे सर्पमित्राकडून त्याला सापाला पकडून घरापासून लांब सोडण्यात आले. सुबोध देवीचा मृत्यू सापाने चावल्याने झाल्याचं सगळ्यांनी मानलं. त्यानंतर सुबोध देवीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. घरातल्या इतर सदस्यांसह पोलिसांनीही ही एक दुर्घटना असल्याचं मानत केस बंद केली. परंतु एका महिन्यानंतर सुबोध देवीच्या घरच्यांनी एक अशी वार्ता ऐकली ती त्यांना सगळ्यांना धक्का बसला. घरातील सून अल्पना फोनवर कुणाला तरी सांगत होती ती सुबोध देवीच्या मृत्यूच्या दिवशी तुला आणि तुझ्या मित्राला कुणी पाहिलं तर नाही? जर कुणी पाहिलं असेल तर मोठं संकट येईल. फोनवरील या संवादाने संपूर्ण घटनाच उलटली. सुबोध देवीच्या पतीने सून अल्पनावर संशय घेत पत्नीच्या मृत्यूबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली.
मोबाईलवर १२४ वेळा संवाद
तपासावेळी समजलं की, सुबोध देवीची सून अल्पना हिचे मनीष नावाच्या मुलाशी प्रेमसंबंध होते आणि रोज अल्पनासोबत सासू सुबोध देवीचं भांडण होत असे. पोलिसांनी फोन रेकॉर्ड तपासले तेव्हा हैराण झाले. ज्या दिवशी सुबोध देवीचा मृत्यू झाला होता तेव्हा अल्पना तिच्या प्रियकरासोबत तब्बल १२४ वेळा फोनवर बोलली. तर मनीषच्या एका मित्रासोबत १९ वेळा बोलली होती. त्यानंतर अल्पना आणि मनीष पोलिसांच्या रडारवर आले. या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. तेव्हा मनीषने जे सांगितले त्याने पोलीस हैराण झाले. मनीषने प्रेयसी अल्पनासोबत मिळून सासूला सापाचा दंश देऊन ठार केले. अल्पनाच्या सासूने सूनेच्या अनैतिक संबंधाला विरोध केला होता. सासूने मुलाला अल्पनाच्या करतूत सांगण्याची धमकी दिली त्यानंतर अल्पना आणि मनीषनं मिळून सुबोध देवीचा काटा काढण्याचा डाव रचला.
२ जून २०१९ रोजी अल्पनाने रात्री सासूला मिल्क शेकमध्ये झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर मनीषने हळूच विषारी साप सासूच्या खोलीत सोडला. १० हजारात साप खरेदी केला होता. साप चावेल की नाही या संशयाने सुरुवातीला दोघांनी सासूचा श्वास रोखला त्यानंतर विषारी साप सोडला. सकाळी अल्पनाने सासूला चाप चावल्याचा बहाणा करत नाटक सुरू केले. जवळपास महिनाभराने हे सगळं षडयंत्र समोर आलं जेव्हा अल्पना मनीषसोबत फोनवर बोलत होती.