सलग दुसऱ्या दिवशी नक्षलवाद्यांकडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 22:21 IST2019-12-21T22:17:23+5:302019-12-21T22:21:15+5:30
कसनसूर ते कोटमी या मुख्य डांबरी रस्त्यावर सदर इसमाचा मृतदेह सकाळी पडून होता

सलग दुसऱ्या दिवशी नक्षलवाद्यांकडून हत्या
एटापल्ली (गडचिरोली) : नक्षलवाद्यांनी सलग दुसऱ्या दिवशी एका अनोळखी इसमाची गळा कापून हत्या केल्याची घटना शनिवारी एटापल्ली तालुक्यात उघडकीस आली. कसनसूर ते कोटमी या मुख्य डांबरी रस्त्यावर सदर इसमाचा मृतदेह सकाळी पडून होता.
कोटमी पो.स्टे.अंतर्गत येणाऱ्या झुरी गावातील नागरिकांना हा मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी कोटमी पोलिसांना ही माहिती दिली. त्यांनी मृतदेह कसनसूरला घेऊन जाण्यास सांगितले. तेथून पोलिसांनी वाहनाची व्यवस्था करून दिल्यानंतर मृतदेह संध्याकाळी शवपरिक्षणासाठी एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.
सदर मृतदेह ज्या ठिकाणी पडून होता तिथे दगडाखाली एक चिठ्ठीही होती. परंतू अशिक्षितपणामुळे त्या चिठ्ठीत काय लिहिले आहे हे नागरिकांना समजले नाही. मात्र ती चिठ्ठी नक्षलवाद्यांनीच लिहून ठेवली असण्याची शक्यता असून पोलीस खबरी असल्याच्या संशयातून ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी भामरागड तालुक्यात अशाच पद्धतीने एका इसमाची नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.