चक्कर येऊन डोक्यावर पडल्याचा बनाव; धाकट्याने मोठ्या भावाचा खून केला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 08:28 PM2022-07-01T20:28:09+5:302022-07-01T20:28:18+5:30
बलवडी (भा.) येथील घटना : संशयित विनोद याने वैभव यास उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी संशयित विनोद याने वैभव याला चक्कर येऊन तो दगडावर आपटल्याने जखमी झाल्याचे डॉक्टरांना सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क -
विटा : घरगुती किरकोळ वादातून दारू पिऊन शिवीगाळ केल्याच्या रागातून नारळ सोलण्याचा लोखंडी सुळका डोक्यात घालून धाकट्या भावाने थोरल्या भावाचा निर्घृण खून केला. घटना खानापूर तालुक्यातील बलवडी (भा.) येथील वेताळबा वस्तीवर गुरूवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. वैभव अर्जुन पवार (वय ३८, रा. बलवडी-भा.)असे मृत झालेल्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी विटा पोलिसांनी विनोद अर्जुन पवार (वय २४) या धाकट्या भावास अटक केली आहे.
बलवडी (भा.) येथील वेताळबा वस्तीवर वैभव व विनोद पवार हे दोघे सख्खे भाऊ कुटुंबियांसह राहण्यास आहेत. गुरूवारी रात्री विनोद पवार याचा थोरला भाऊ वैभव हा दारू पिऊन आल्यानंतर त्याने घरगुती किरकोळ कारणावरून विनोद यास शिवीगाळ केली. याचा राग आल्याने विनोद याने घराच्या अंगणात असलेले नारळ सोलण्याचे लोखंडी मशीन उचलून दोन ते तीन वेळा वैभव याच्या डोक्यात मारून त्यास गंभीर जखमी केले.
त्यानंतर संशयित विनोद याने वैभव यास उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी संशयित विनोद याने वैभव याला चक्कर येऊन तो दगडावर आपटल्याने जखमी झाल्याचे डॉक्टरांना सांगितले. परंतु, उपचारापूर्वीच वैभव याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेची माहिती पोलीसांना मिळताच पोलीस उपअधिक्षक पद्मा कदम व पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी संशयित दारू पिऊन शिवीगाळ केल्याने संशयित विनोद याने वैभव पवार याच्या डोक्यात नारळ सोलण्याची लोखंडी मशीन घालून त्याचा खून केल्याची माहिती उजेडात आली. याप्रकरणी मयत वैभव याची आई अलका पवार यांनी विटा पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित विनोद पवार यास पोलीसांनी अटक केली.