५० हजारांसाठी ओढणीने गळा आवळून गरोदर महिलेचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 08:26 AM2023-04-29T08:26:31+5:302023-04-29T08:26:55+5:30
देऊळगाव मही येथील रविशंकर शांताराम डिघे यांची मुलगी निकिता हिचा विवाह जाफराबाद तालुक्यातील सिद्धी येथील सुखराम लोखंडे याच्यासोबत मागच्या वर्षी झाला.
जालना : हुंड्याचे राहिलेले ५० हजार रुपये न दिल्याने सासरच्यांनी गरोदर असलेल्या महिलेचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर मयत महिलेने गळफास घेतल्याचा बनाव केल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील सिद्धी येथे २६ एप्रिल रोजी घडली. निकिता सुखराम लोखंडे असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा नवऱ्यासह तीन जणांवर जाफराबाद पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देऊळगाव मही येथील रविशंकर शांताराम डिघे यांची मुलगी निकिता हिचा विवाह जाफराबाद तालुक्यातील सिद्धी येथील सुखराम लोखंडे याच्यासोबत मागच्या वर्षी झाला. लग्नावेळी रविशंकर डिघे यांनी सुखराम याला हुंडा दिला होता. त्यातील ५० हजार रुपये राहिले होते. लग्नानंतर काही दिवसांनी पती सुखराम, लक्ष्मण महादू लोखंडे, मंगलाबाई महादू लोखंडे यांनी हुंड्याचे राहिलेले पैसे घेऊन ये, असे म्हणून निकिताचा मानसिक व शारीरिक छळ केला. त्यातच निकिता गरोदर राहिली. परंतु, तरीही संशयितांनी छळ सुरूच ठेवला. २६ एप्रिल रोजी तिन्ही संशयितांनी निकिताचा ओढणीने गळा आवळून खून केला.